
सोलापूर, 3 डिसेंबर, (हिं.स.)। भोगाव येथील जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन प्रकल्पातील गंभीर निष्काळजीपणाबाबत बायोक्लीन सिस्टिम इंडिया प्रा. लि. या मक्तेदार कंपनीला पुढील ५ वर्षांसाठी काळ्या यादीत समाविष्ट करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या मान्यतेने घेण्यात आला आहे.महापालिकेच्या तपासणी आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालानुसार, प्रकल्प हस्तांतरणाच्या काळात तसेच त्याआधी कंपनीने जैववैद्यकीय कचऱ्याची नियमानुसार प्रक्रिया न केल्याचे स्पष्ट झाले.
प्रकल्प परिसरात पडून राहिलेल्या ४०–५० टन जैववैद्यकीय कचऱ्याबरोबरच ETP Sludge, कार्बन (एकूण २५ टन) व Incineration Ash (१५ टन) यांची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी मक्तेदारावर होती. मात्र महानगरपालिकेकडून दिलेल्या मुदती आणि नोटिसी असूनही कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही.
परिणामी महानगरपालिकेला नवीन प्रकल्प चालक नियुक्त करून संपूर्ण कचरा सुरक्षितरीत्या नष्ट करावा लागला. या विल्हेवाटीसाठी ₹42,59,694 इतका खर्च झाला असून तो खर्च पूर्वीच्या मक्तेदाराकडून वसूल करण्याचे आदेश अनेक सुनावण्यांद्वारे देण्यात आले. अंतिम सूचना देऊनही कंपनीने दुर्लक्ष केल्यामुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले.महानगरपालिकेच्या उपसमितीकडून तयार झालेला प्रस्ताव प्रशासनाकडे पाठवण्यात आला होता. त्यानुसार 21 नोव्हेंबर 2025 रोजी आयुक्तांनी कंपनीला ५ वर्षांसाठी काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय मान्य केला. तसेच पुढील आवश्यक कार्यवाहीसही मंजुरी देण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड