कर्करोग निदान उपक्रमाला ठाणे जिल्ह्यात उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद
ठाणे, 3 डिसेंबर (हिं.स.)। ठाणे जिल्ह्यात नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी राबविण्यात येत असलेल्या कर्करोग निदान उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, जिल्ह्यात फिरत असलेली कर्करोग डायग्नोस्टिक व्हॅन अल्पावधीत हजारोंपर्यंत नागरिकांपर्यंत पोहोचली
ठाणे


ठाणे, 3 डिसेंबर (हिं.स.)। ठाणे जिल्ह्यात नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेसाठी राबविण्यात येत असलेल्या कर्करोग निदान उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, जिल्ह्यात फिरत असलेली कर्करोग डायग्नोस्टिक व्हॅन अल्पावधीत हजारोंपर्यंत नागरिकांपर्यंत पोहोचली आहे. जिल्हाधिकारी ठाणे डॉ. श्रीकृष्ण पांचाळ व मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम दिनांक ३ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत राबविण्यात आला.

या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे कर्करोगाचे लवकर निदान करून नागरिकांना तात्काळ उपचाराखाली आणणे, मार्गदर्शन करणे, तसेच कर्करोगाविषयी जागरूकता वाढविणे. कर्करोगाचे वेळेत निदान झाल्यास उपचार अधिक परिणामकारक होतात, या कारणामुळे हा उपक्रम जिल्ह्यासाठी अत्यंत महत्वाचा ठरला आहे.

उपक्रमाची वैशिष्ट्ये

•विविध गावांमध्ये फिरणाऱ्या या व्हॅनद्वारे मोफत कर्करोग तपासणी करण्यात आली.

• प्रमुख तीन कर्करोगाच्या तपासण्या करण्यात आल्या:

o मुख कर्करोग

o स्तन कर्करोग

o गर्भाशय मुख कर्करोग

• ठाणे जिल्ह्यातील कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, मुरबाड आणि शहापूर या पाच तालुक्यांमध्ये नियोजित वेळापत्रकानुसार तपासण्या पार पडल्या.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या सेवेमुळे अल्पावधीत मोठ्या प्रमाणावर नागरिकांपर्यंत मोफत तपासणी सुविधा पोहोचली असून उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला आहे.

तपासणीची आकडेवारी (३ नोव्हेंबर – २९ नोव्हेंबर २०२५)

• मुख कर्करोग तपासणी – २४४१ नागरिक

• स्तन कर्करोग तपासणी – १४९२ महिला

• गर्भाशय मुख कर्करोग तपासणी – १२१० महिला

• एकूण तपासणी – ५१४३ नागरिक

यापैकी तपासलेल्या नमुन्यांमध्ये—

• ५ मुख कर्करोग संशयित

• ३४ स्तन कर्करोग संशयित

• १४ गर्भाशय मुख कर्करोग संशयित

असे एकूण ५३ व्यक्ती संशयित कर्करुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ८ जणांचे नमुने पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविण्यात आले आहेत.

तालुका आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका यांनी गावोगाव नागरिकांना या उपक्रमाविषयी माहिती दिली आणि मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. स्थानिक स्वयंसेवी संस्था आणि ग्रामपंचायतींचा देखील सक्रिय सहभाग होता.

ग्रामीण भागातील महिलांना आणि सर्वसाधारण नागरिकांना सहज उपलब्ध तपासणी सुविधा, कर्करोगाबाबतची भीती व गैरसमज कमी करणे, लवकर निदानामुळे उपचार सुलभ व परिणामकारक करणे, आरोग्य जागरूकतेद्वारे समाजात सकारात्मक बदल घडविण्याचे महत्त्वाचे कामकाज करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande