
रत्नागिरी, 3 डिसेंबर, (हिं. स.) : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी आस्था संस्थेच्या कामाची पाहणी केली.दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांच्या सूचनेनुसार दिव्यांगांसाठी कार्यरत संस्थांची पाहणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्यामार्फत करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने रत्नागिरी जिल्ह्यात दिव्यांग पुनर्वसनाचे कार्य करणाऱ्या आस्था सोशल फाउंडेशन या संस्थेच्या कामाची पाहणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली समितीने केली.
आस्था सोशल फाउंडेशनच्या दिव्यांग हेल्पलाइन, आस्था थेरपी सेंटर व फिरते श्रवण चाचणी कक्ष या प्रकल्पाच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामाची माहिती घेतली आणि कामाबद्दल समितीने समाधान व्यक्त केले.
या समितीत जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी सुनीता शिरभाते, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता संजय बलाढ्ये यांचा समावेश होता. संस्थेच्या सचिव श्रीमती सुरेखा पाथरे, संकेत चाळके आणि श्रीमती संपदा कांबळे यांनी संस्थेची माहिती समितीला दिली.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी