मतमोजणी एकाच दिवशी; अचानक बदललेल्या निर्णयाने राजकीय वर्तुळात खळबळ
रायगड, 3 डिसेंबर (हिं.स.)। रायगड जिल्ह्यातील दहा नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान पार पडले. मात्र, 3 डिसेंबरला अपेक्षित असलेली मतमोजणी पुढे ढकलण्यात आल्यानंतर उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची धाकधूक वाढली आहे. उच्च न्याय
मतमोजणी एकाच दिवशी; अचानक बदललेल्या निर्णयाने राजकीय वर्तुळात खळबळ


रायगड, 3 डिसेंबर (हिं.स.)। रायगड जिल्ह्यातील दहा नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान पार पडले. मात्र, 3 डिसेंबरला अपेक्षित असलेली मतमोजणी पुढे ढकलण्यात आल्यानंतर उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांची धाकधूक वाढली आहे. उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार आता सर्व नगरपालिकांची मतमोजणी 21 डिसेंबर रोजी एकाच दिवशी होणार असून निकालासाठी तब्बल 19 दिवसांची प्रतिक्षा करावी लागणार आहे. या विलंबामुळे उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

मतदानानंतर दुसऱ्याच दिवशी निकाल लागणार ही सर्वांची अपेक्षा होती. अनेकांनी आधीच विजयाच्या तयारीला सुरुवात केली होती. नवरंग, गुलाल, वाद्यपथकांची ऑर्डर देण्यात आली होती. काही ठिकाणी तर विजयानंद साजरा करण्यासाठी कार्यकर्त्यांनी नियोजनही पूर्ण केले होते. सकाळपासूनच मतदारांना मतदानासाठी बाहेर काढण्यात उत्साह दिसत होता. मात्र, अचानक न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर सर्वच गणित बदलले.

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल याचिकेवर सुनावणीदरम्यान, 2 डिसेंबरला झालेल्या तसेच 20 डिसेंबरला होणाऱ्या मतदानाची मतमोजणी एकाच दिवशी – म्हणजे 21 डिसेंबरला घेण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे उमेदवारांचा उत्साह कमी झाला असून प्रतीक्षेचा काळ अधिक मोठा झाल्याने त्यांच्यात नाराजीचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान, कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की, निकाल जितक्या लवकर लागू तितके राजकीय तणाव कमी होतात. “ज्या ठिकाणी निवडणूक पुढे ढकललेली नव्हती, तिथे मतमोजणी उद्याच व्हायला हवी होती,” अशी भावना शेकाप नेते प्रशांत नाईक (अलिबाग) यांनी व्यक्त केली.

निकाल लांबणीवर गेल्याने उमेदवार, पक्षनेते आणि कार्यकर्त्यांचा ताण मात्र आणखी वाढल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande