मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षणाची मागणी; मुंबई–नागपूर पदयात्रा अमरावतीत दाखल
अमरावती, 3 डिसेंबर (हिं.स.) मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण तसेच अनुसूचित जाती उपवर्गीकरण (अ-ब-क-ड) तात्काळ लागू करण्याच्या मागणीसाठी निघालेली मुंबई ते नागपूर भव्य पदयात्रा आज अमरावतीत दाखल झाली. लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक–अध्यक्ष विष्णुभाऊ कासबे य
मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षणाची मागणी;  मुंबई–नागपूर पदयात्रा अमरावतीत दाखल, नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत


अमरावती, 3 डिसेंबर (हिं.स.)

मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण तसेच अनुसूचित जाती उपवर्गीकरण (अ-ब-क-ड) तात्काळ लागू करण्याच्या मागणीसाठी निघालेली मुंबई ते नागपूर भव्य पदयात्रा आज अमरावतीत दाखल झाली. लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक–अध्यक्ष विष्णुभाऊ कासबे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या पदयात्रेला अमरावतीकरांनी मोठ्या उत्साहाने स्वागत करून भक्कम साथ दिली.समाजावर सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक स्तरावर होणारी उपेक्षा तसेच अन्याय वाढत असल्याने स्वतंत्र आरक्षणाची मागणी आता तीव्र होत आहे. सर्वोच्च न्यायालयाने २०१४ मध्ये दिलेल्या निर्णयानुसार अनुसूचित जातीतील १३% आरक्षणाचे अ-ब-क-ड अशा उपविभागात उपवर्गीकरण करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले गेले होते. मात्र, महाराष्ट्र शासनाने आजतागायत त्याची अंमलबजावणी न केल्याचा आरोप समाजनेत्यांनी केला.

याशिवाय मातंग समाजावरील अत्याचारांना आळा घालण्यासाठी विशेष कायदे, दिवंगत समाजसेविका कांताबाई साळवे यांच्या नावाने अध्ययन केंद्र, साहित्यिक डॉ. आनाभाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ पुरस्कार जाहीर करणे, तसेच समाजातील विद्यार्थ्यांसाठी १००० कोटींच्या शैक्षणिक विकास महामंडळाची स्थापना— अशा महत्त्वपूर्ण मागण्या या पदयात्रेमार्फत शासनापुढे मांडण्यात येत आहेत.मुंबई–ठाणे मार्गाने सुरुवात झालेली ही पदयात्रा राज्यातील अनेक जिल्ह्यांतून प्रवास करत १० डिसेंबर रोजी नागपूर विधानभवनावर पोहोचणार आहे. तेथे शासनाला मागण्यांचे निवेदन सादर करण्यात येणार आहे. राज्यभरातून मिळत असलेला उत्स्फूर्त लोकसहभाग पाहता ही पदयात्रा ऐतिहासिक ठरणार असून, मातंग समाजाच्या हक्कांसाठीचा हा लढा निर्णायक वळण घेईल, असा विश्वास विष्णुभाऊ कासबे यांनी व्यक्त केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande