
बीड, 3 डिसेंबर (हिं.स.)।
“प्रसाद योजना” (तीर्थयात्रा पुनरुज्जीवन आणि आध्यात्मिक संवर्धन मोहीम) बाबत केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह यांची बीड जिल्ह्यातील भाजप आमदार सुरेश धस यांनी आज भेट घेतली
आष्टी विधानसभा मतदारसंघात अनेक प्राचीन, ऐतिहासिक तसेच धार्मिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण स्थळांचा समावेश असून दरवर्षी हजारो भाविक आणि पर्यटक येथे दर्शनासाठी व पर्यटनासाठी येत असतात. तथापि, या ठिकाणी आवश्यक मूलभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे अपेक्षित प्रमाणात विकास साधता आलेला नाही, ही बाब प्रकर्षाने जाणवत आहे.
धार्मिक पर्यटन स्थळांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारतर्फे राबविण्यात येणारी “प्रसाद योजना” (तीर्थयात्रा पुनरुज्जीवन आणि आध्यात्मिक संवर्धन मोहीम) ही अत्यंत महत्त्वपूर्ण आणि परिणामकारक योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून विशेष बाब म्हणून आष्टी, पाटोदा आणि शिरूर कासार तालुक्यातील एकूण 50 तीर्थक्षेत्रे आणि पर्यटन स्थळांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याबाबत मी केंद्रीय गृहमंत्री मा. अमितभाई शाह यांच्याकडे औपचारिक मागणी केली आणि यासंदर्भात सविस्तर भेट घेऊन चर्चा केली.
या चर्चेदरम्यान संबंधित विभागामार्फत तातडीने निधी उपलब्ध होण्यासाठी आवश्यक त्या प्रक्रियांना गती देण्याची विनंती केली. आष्टी मतदारसंघातील धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटन वारशाचा विकास व्हावा, तसेच भाविकांना उत्तम सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील राहील, याची नागरिकांना खात्री देतो. असे आमदार सुरेश धस म्हणाले
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis