प्रेम प्रकरणातील हत्येवर प्रकाश आंबेडकरांनी तीव्र प्रतिक्रिया
तरुणीच्या भूमिकेला पाठिंबा दिला
प्रेम प्रकरणातील हत्येवर प्रकाश आंबेडकरांनी तीव्र प्रतिक्रिया


नांदेड, 3 डिसेंबर (हिं.स.)।

नांदेड शहरातील आंतरजातीय प्रेमप्रकरणातील हत्येवर प्रकाश आंबेडकरांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवली असून तरुणीच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे

नांदेडमध्ये आंतरजातीय प्रेमसंबंधाला विरोध करत कुटुंबीयांनी तरुणीच्या प्रियकराची हत्या केल्याच्या धक्कादायक घटनेनंतर राज्यभरात संतापाचे वातावरण आहे. तरुणीने आपल्या प्रियकराच्या मृतदेहासमोर विवाह केल्याने प्रकरण अधिकच चर्चेत आले आहे.

या घटनेवर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मीडियाद्वारे प्रतिक्रिया देत तीव्र नाराजी व्यक्त केली.

आंबेडकर म्हणाले, “नांदेडमधील सक्षम ताटे या बौद्ध तरुणाची प्रेमप्रकरणातून अमानुष हत्या करण्यात आली. मुलीच्या कुटुंबीयांनी आंतरजातीय विवाहाला विरोध करत जातीय द्वेषातून ही घटना घडवून आणली.”

पुढे ते म्हणाले, “या प्रकरणात तरुणीने घेतलेल्या भूमिकेला आमचा पूर्ण पाठिंबा आहे.”

तरुणीने केलेल्या कृतीबाबत आंबेडकर म्हणाले, “सक्षम ताटे यांच्या हत्येनंतर तरुणीने मृतदेहाशी विवाह करण्याची घोषणा केली आणि आरोपींना अटक करण्याची मागणी केली. तिच्या या भूमिकेला आम्ही दाद देतो. आम्ही पीडित कुटुंबीय आणि तरुणीच्या संपूर्णपणे सोबत आहोत.”

या घटनेमुळे आंतरजातीय विवाह, जातीय भेदभाव आणि सामाजिक दृष्टिकोनावरील चर्चा राज्यभरात तीव्र झाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande