
सोलापूर, 3 डिसेंबर, (हिं.स.)। मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांची राजकीय पत संपली आहे. त्यांना आमदार निवडून आणता आला नाही. साखर कारखाना व डिसीसी बँकेच्या कर्जासाठी ते भाजपसोबत गेले आहेत. मोहोळ नगरपंचायतीच्या निवडणुकीत आमचीच सरशी होणार आहे. झेडपी निवडणुकीनंतर त्यांना पक्ष राहणार नाही. त्यामुळे त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षात जावे असा सल्ला मोहोळचे आमदार राजू खरे यांनी येथे बोलताना दिला.
आमदार राजू खरे जिल्हा परिषदेत आले होते. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांना भेटून परतत असताना पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. निधीची अडचण आहे काय? असे पत्रकारांनी विचारल्यावर आमचा ते म्हणाले, अजिबात तक्रार नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे मला अडचण नाही. तुम्ही तुतारीवर निवडून आलात असे विचारल्यावर आमदार खरे म्हणाले, 1990 पासून मी सच्चा शिवसैनिक आहे. निधीसाठी आमचाही संघर्ष आहे. पण तो कसा मिळवायचा हे आम्हाला माहिती आहे. तुम्ही सर्व व्यासपीठावर दिसलात. आता नेमका पक्ष कोणता असे विचारल्यावर ते म्हणाले, मंत्री माझ्या मतदार संघात आल्यावर त्यांचे स्वागत करणे माझे कर्तव्य आहे. झेडपी निवडणुकीत मी उमेश पाटील, काका साठे यांना सोबत घेऊन माझ्या मतदार संघातील सर्व 10 जागा यशस्वी करणार आहे, असा दावा केला.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड