
पुणे, 3 डिसेंबर (हिं.स.)। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात लिंगभाव जाणीव जागृती केंद्र, स्वयंसिद्धा व्यासपीठ आणि स्त्री व लिंगभाव अभ्यास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रशासकीय विभागातील कर्मचाऱ्यांसाठी लिंगभाव संवेदीकरण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेला प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. अर्चना मोरे तसेच अभिनेत्री गिरीजा ओक गोडबोले उपस्थित होत्या. माननीय कुलसचिव प्रा. (डॉ.) ज्योती भाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रा. (डॉ.) ज्योती भाकरे यांनी ‘कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ अधिनियम, २०१३’ या कायद्याची पार्श्वभूमी स्पष्ट केली.
बदलत्या सामाजिक संरचनेत हा कायदा अधिक महत्त्वाचा ठरत असून, स्त्रियांच्या वाढत्या सार्वजनिक सहभागाच्या पार्श्वभूमीवर शोषण करणाऱ्या व्यवस्थांना प्रश्न विचारणे आणि संवेदनशील दृष्टिकोन जोपासणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. स्वयंसिद्धा सारखे उपक्रम कर्मचारी वर्गासाठी मार्गदर्शक आणि दिशादर्शक ठरतील, असेही त्यांनी सांगितले.
ॲड. अर्चना मोरे यांनी महिलांच्या सुरक्षिततेसाठी ‘लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई आणि निवारण अधिनियम, २०१३’ची सविस्तर माहिती दिली.
या कायद्याचा योग्य वापर, स्त्रियांनी आपल्या हक्कांबाबत न घाबरता पुढे येण्याची गरज आणि न्याय मिळवण्यासाठी आवाज उठवण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
सुप्रसिद्ध अभिनेत्री गिरीजा ओक गोडबोले यांनी माध्यम क्षेत्रातील कामानुभवातून महिलांना येणाऱ्या अडचणींची मांडणी केली. दैनंदिन जीवनात स्त्रियांना स्वतःच्या सुरक्षिततेसाठी खर्च करावा लागणाऱ्या अतिरिक्त गोष्टी—प्रसाधनगृहासाठी चांगल्या कॅफेमध्ये जाणे, सुरक्षित वाहतूक व्यवस्था निर्माण करणे यांसारख्या उदाहरणांतून स्त्रियांच्या सामाजिक गैरसोयींकडे त्यांनी लक्ष वेधले.
कार्यशाळेतील तीनही सत्रांतून स्त्रियांना संविधानाने दिलेले हक्क प्रत्यक्षात अनुभवता यावेत यासाठी घरापासून कार्यस्थळापर्यंत लिंगसंवेदनशील वर्तनाची गरज स्पष्ट करण्यात आली. स्त्री-पुरुष भेदांच्या पलीकडे जाऊन माणुसकी, समता आणि संवेदनशीलता यांवर आधारित समाजनिर्मिती करण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु