
पुणे, 3 डिसेंबर (हिं.स.) पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रामधील सर्व कोचिंग क्लासेस, शाळा, महाविद्यालये, प्रशिक्षण केंद्रे अशा विविध शैक्षणिक संस्थांसाठी अग्निसुरक्षा नोंदणी आणि अग्नी सुरक्षितता पूर्तता प्रमाणपत्र अनिवार्य आहे. त्यामुळे संबंधित सर्व शैक्षणिक संस्थांनी अग्निशमन विभागामध्ये ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करून अधिकृत अग्निसुरक्षा प्रमाणपत्र घ्यावे, असे आवाहन महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून करण्यात आले आहे.
कोणतीही शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लास, अकादमी किंवा प्रशिक्षण केंद्र हे अग्निसुरक्षेच्या नियमांपासून मुक्त नाही. अग्निशमन यंत्रणा, आपत्कालीन मार्ग, फायर अलार्म प्रणाली तसेच प्रशिक्षित कर्मचारी यांची उपलब्धता ही प्रत्येक संस्थेची जबाबदारी आहे. त्यामुळे नियमांचे पालन न करणाऱ्या संस्थांवर महापालिकेमार्फत नियमानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे.विद्यार्थी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी अग्निसुरक्षा उपाय असणे गरजेचे असून, सर्व संस्थांनी निर्धारित नियमांचे पालन करावे. आपला व्यावसायिक वापर असलेला परिसर अग्नी सुरक्षित करणे व ठेवणे ही संबंधित संस्था चालक-मालक यांची जबाबदारी असून, सदर शैक्षणिक संस्थेची क्लासेसची नोंदणी व आवश्यक अग्नी सुरक्षितता उपाय योजना केल्यास गंभीर दुर्घटना टाळण्यास मोठी मदत होईल, असेही अग्निशमन विभागातून स्पष्ट करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु