
सोलापूर, 3 डिसेंबर (हिं.स.)।
महापालिकेच्या रामवाडी नागरी आरोग्य केंद्रामध्ये एक्स-रे टेक्निशियन असलेल्या गुरुप्रसाद इनामदार या कर्मचाऱ्याने महिला रुग्णांबरोबर चुकीचे वर्तन केले. महिलांना लज्जा वाटेल असे कृत्य केले. संबंधित महिला रुग्णांच्या नातेवाइकांनी कर्मचाऱ्याला रामवाडी प्रसूतिगृहातच बेदम चोप दिला. तर महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी तत्काळ संबंधित कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.
रामवाडी नागरी आरोग्य केंद्रात तपासणीसाठी येणाऱ्या महिलांची संख्या मोठी आहे. पाच दिवसांपूर्वी महिला रुग्ण तेथे तपासणीसाठी आल्या होत्या. एक्स-रे लॅबमध्ये महिलांसोबत महिला कर्मचारी असणे बंधनकारक आहे. त्यानुसार या केंद्रात एक्स-रे टेक्निशियनसह एका महिला कर्मचाऱ्याची नियुक्तीही केली आहे.
मात्र संबंधित कर्मचाऱ्यांनी महिला कर्मचाऱ्याला बाहेर काढले. त्यानंतर एक्स-रे काढताना महिला रुग्णासोबत चुकीचे वर्तन केले. संबंधित महिलेने हा प्रकार कुटुंबीयांना सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांनी कर्मचाऱ्याला बेदम चोप दिला. तसेच यापूर्वीही महापालिकेतील महिला कर्मचाऱ्यांना अशाच पद्धतीने त्रास दिल्याच्याही तक्रारी या कर्मचाऱ्याच्या विरोधात होत्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड