
पुणे, 3 डिसेंबर (हिं.स.) :सिंहगड रस्त्यावर मेट्रोचे काम करताना उड्डाण पुलाचे काय होणार? नव्याने उभारलेला उड्डाण पूल पाडणार की बाजूला मेट्रोचे खांब येणार, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे. मात्र, उड्डाण पूल बांधतानाच मेट्रोच्या खांबांची जागा निश्चित केली असून, मेट्रोचे खांब उभारण्यासाठी ६६ ठिकाणी उड्डाण पुलाला छेद दिला जाणार आहे.त्यामुळे उड्डाण पुलाची रुंदी जवळपास प्रत्येकी दोन मीटरने कमी होईल, असे महापालिकेकडून सांगण्यात आले. त्यामुळे मेट्रोचे काम सुरू असताना, नागरिकांना काही प्रमाणात त्रास सहन करावा लागणार आहे.केंद्र सरकारने नुकतीच खडकवासला ते हडपसर-खराडी आणि नळस्टॉप ते माणिकबाग या ३२ किलोमीटर लांबीच्या आणि ९८५८ कोटी रुपये खर्चाच्या नवीन मेट्रो मार्गाला मंजुरी दिली. सिंहगड रस्त्यावरील कोंडी फोडण्यासाठी महापालिकेने ११८ कोटी रुपये खर्च करून उड्डाण पूल बांधला आहे.यामुळे बऱ्यापैकी वाहतुकीचा प्रश्न कमी झाला. पण हा उड्डाण पूल सुरू होऊन अवघे काही महिने झाले असताना, आता मेट्रोच्या कामासाठी उड्डाण पुलाची तोडफोड होणार का, मेट्रोचे खांब कुठे असणार, असे प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु