ऑरेंज गेट बोगदा प्रकल्पामुळेे मुंबईच्या वाहतुकीस दिलासा मिळणार - मुख्यमंत्री
मुंबई, 3 डिसेंबर (हिं.स.)। : पूर्व मुक्त मार्गामुळे नागरिकांना पूर्व उपनगरातून दक्षिण मुंबईत 20-25 मिनिटांत पोहोचता येते; मात्र पुढील प्रवासासाठी अर्धा ते पाऊण तास वाहतूक कोंडीत अडकावे लागत होते. तसेच पश्चिम उपनगर आणि दक्षिण मुंबईतील नागरिकांना न
मुंबई


मुंबई, 3 डिसेंबर (हिं.स.)। : पूर्व मुक्त मार्गामुळे नागरिकांना पूर्व उपनगरातून दक्षिण मुंबईत 20-25 मिनिटांत पोहोचता येते; मात्र पुढील प्रवासासाठी अर्धा ते पाऊण तास वाहतूक कोंडीत अडकावे लागत होते. तसेच पश्चिम उपनगर आणि दक्षिण मुंबईतील नागरिकांना नवी मुंबई विमानतळाकडे जाण्यासाठी लांबचा मार्ग घ्यावा लागत होता. या समस्येवर तोडगा म्हणून ऑरेंज गेट बोगद्याची संकल्पना मडण्यात आली,या प्रकल्पामुळे मुंबईच्या वाहतुकीस मोठा दिलासा मिळणार आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी महत्त्वाकांक्षी ऑरेंज गेट ते मरीन ड्राईव्ह शहरी बोगदा प्रकल्पाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी टनेल बोरिंग मशीन (टीबीएम) चे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार अमीन पटेल, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या आयुक्त रुबल अग्रवाल आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पूर्वी या ठिकाणी फ्लायओव्हर उभारण्याचा विचार होता; परंतु जागेअभावी आणि प्रचंड वाहतुकीमुळे ते शक्य नाही. हा परिसर मोहम्मद अली रोड फ्लायओव्हरपेक्षाही अधिक दाटीचा असल्याने बोगदा हा एकमेव व्यावहारिक आणि सुरक्षित पर्याय आहे. हा बोगदा जवळपास 700 प्रॉपर्टीजच्या खालून, शंभर वर्षे जुन्या हेरिटेज इमारती, तसेच पश्चिम आणि मध्य रेल्वे लाईन्सखालून जाणार आहे. विशेष म्हणजे, हा बोगदा मेट्रो-3 च्या 50 मीटर खाली खोदला जाणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प एका अर्थाने ‘इंजिनिअरिंग मार्व्हल’ ठरणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी नमूद केले.

या प्रकल्पाचे काम डिसेंबर 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असून, ते आणखी सहा महिने आधी पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. एल अ‍ॅण्ड टी या नामांकित कंपनीकडे कामाची जबाबदारी सोपवण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.वरळी–शिवडी सी-लिंक पुढील वर्षी खुला झाल्यानंतर, तसेच कोस्टल रोड जोडणी झाल्यावर, पश्चिम उपनगरातील लोकांनाही नवी मुंबई विमानतळाकडे जाण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध होतील. त्यामुळे हजारो लोकांचे हजारो तास वाचवणारा हा प्रकल्प असून, मुंबईच्या वाहतुकीसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

ऑरेंज गेट–मरीन ड्राइव्ह बोगदा प्रकल्प मुंबईच्या वाहतुकीला दिलासा देणारा -उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अटल सेतू मार्गे ठाणे, नवी मुंबईवरून येणारी मोठी वाहतूक मुक्त मार्गाच्या उतरणीजवळ कोडीत अडकत असून मागे उद्घाटन झालेल्या अटल सेतूची वाहतूक ही आता इथे येत आहे. या नव्या बोगद्यामुळे ही कोंडी मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. त्याचप्रमाणे, मरीन ड्राइव्ह, चर्चगेट, कोस्टल रोडकडे जाणाऱ्या वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

हा बोगदा पूर्व आणि पश्चिम मुंबईला जोडणारा ठरणार असून लाखो नागरिकांचा प्रवास वेळ वाचवेल, असे त्यांनी सांगितले. ज्याप्रमाणे मेट्रो ३, मेट्रो २ए, मेट्रो ७ सारख्या प्रकल्पांनी शहराला दिलासा दिला, तसाच हा भूमिगत बोगदाही वाहतूक व्यवस्थेचा चेहरामोहरा बदलणार आहे. हा बोगदा मेट्रो ३ च्या खाली जात असल्याने हा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा सर्वोत्तम नमुना असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

या प्रकल्पामुळे इंधन बचत, प्रदूषणात घट आणि कार्यालयीन प्रवासात वेळेची मोठी बचत होणार असल्याचे ते म्हणाले. मुंबई–पश्चिम उपनगर आणि नवी मुंबई विमानतळाकडे जाणाऱ्यांनाही या बोगद्याचा मोठा फायदा होणार आहे. मुंबईतील भूमिगत वाहतूक व्यवस्थेचा हा मोठा प्रयोग असून फ्लायओव्हर, कोस्टल बोगदा, आणि आता भूमिगत बोगदा या सर्वांमुळे वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात दूर होणार असल्याचे खऱ्या अर्थाने हा गेम चेंजर प्रकल्प असल्याचे त्यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande