
सोलापूर, 3 डिसेंबर (हिं.स.)। सार्वजनिक नळांचे झोननिहाय सर्वेक्षण करून सविस्तर अहवाल तातडीने सादर करावा, तसेच मलनिस्सारण केंद्रात येणारे पाणी बायपास होणार नाही याची काटेकोर दक्षता घ्यावी, असे स्पष्ट निर्देश महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिले. ट्रंक लाईनच्या चेंबरची उंची वाढवण्यासाठी तात्काळ उपाययोजना करण्याचाही त्यांनी आदेश दिला. आयुक्त डॉ. ओम्बासे यांनी सोरेगाव परिसरातील मलनिस्सारण व पाणीपुरवठा संबंधित प्रकल्पांची सखोल पाहणी केली.
नियोजित सांडपाणी पंप हाऊस, प्रतापनगर मलनिस्सारण केंद्र आणि प्रतापनगर तलाव परिसर या भागांचा आढावा घेण्यात आला.या वर्षी प्रतापनगर तलाव अतिवृष्टीमुळे प्रथमच पूर्ण क्षमतेने भरला आहे. तलावातील वाढलेल्या पाण्यामुळे मलनिस्सारण केंद्राकडे जाणाऱ्या मुख्य पाईपलाईनचे चेंबर जलमग्न झाले असून केंद्रात येणाऱ्या पाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. यामुळे प्रक्रिया क्षमतेवर ताण येत असल्याचे निदर्शनास आले.भविष्यात अशी परिस्थिती टाळण्यासाठी चेंबरची उंची वाढवण्याची तातडीची गरज असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. तसेच मलनिस्सारण केंद्रात येणारे सांडपाणी कुठल्याही परिस्थितीत बायपास होऊ नये, यासाठी कठोर देखरेख करण्याचे आदेश दिले.त्याचबरोबर निर्मिती मंगल कार्यालयाजवळील नाला व तार-कंपाउंडवरील अतिक्रमण त्वरित हटवण्याचे निर्देश देण्यात आले. झोन क्रमांक ५ मधील कल्याण नगर भाग-३ येथील सार्वजनिक नळांची आयुक्तांनी प्रत्यक्ष पाहणी केली आणि सर्व झोनमध्ये नळांचे सर्वेक्षण करून तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड