
सोलापूर, 3 डिसेंबर (हिं.स.)।
बाळीवेस येथील महापालिकेंतर्गत असलेल्या बीओटी प्रकल्पाचे काम चौदा वर्षांपासून अर्धवट स्थितीत आहे. १४ वर्षांमध्ये संबंधित मक्तेदार मंत्रीचंडक कन्स्ट्रक्शन कंपनीवर महापालिकेने कोणतीही कारवाई केली नाही. आता कंपनी दिवाळखोरीत निघाल्याचे सांगून महापालिका जागा ताब्यात घेत आहे. १५ वर्षात संबंधित मक्तेदारावर कारवाई का झाली नाही? या दरम्यान महापालिकेचे कोट्यवधींचे नुकसान झाले याला जबाबदार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.सोलापूर शहरातील मध्यवर्ती असलेल्या बाळीवेस येथे महापालिकेच्या जागेवरील पूर्वीच्या राजूबाई मॅटर्निटी होम या ठिकाणी बीओटी प्रकल्प होणार होता. सन २०१० मध्ये जागा कंपनीला दिली होती. २०११ पासून हे काम प्रलंबित आहे. बांधा-वापरा-हस्तांतरित करा (बीओटी) या अंतर्गत हा प्रकल्प उभारण्यात येणार होता. एकूण ३ हजार ५९९ चौरस मीटर बांधकाम केले जाणार होते. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पहिला व दुसरा मजला शॉपिंग सेंटर व इतर तर इमारतीतील तिसरा व चौथा मजला महापालिकेच्या ताब्यात मिळणार होता. तिसऱ्या मजल्यावर महापालिकेचे प्रसूतीगृह पूर्ववत सुरू करण्यात येणार होते.
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड