
ठाणे, 3 डिसेंबर, (हिं.स.) : ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या राजीव गांधी मेडिकल कॉलेज आणि ठाणे जिल्हा स्त्री रोग संघटना, (TOGS) यांच्या संयुक्त विद्यमाने एकदिवसीय सर्जिकल कार्यशाळेचे आयोजन नुकतेच छत्रपती शिवाजी महाराज वैद्यकीय रुग्णालयात केले होते.
या कार्यक्रमास राजीव गांधी मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठाता डॉ. स्वप्नाली कदम आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ अनिरुद्ध माळगावकर आणि TOGS चे अध्यक्ष डॉ महेश जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या सर्जिकल कार्यशाळेमध्ये पारंपारिक पद्धतीने गर्भपिशवी काढायच्या व्हजायनल हिस्टरेक्टॉमी, लेझर मार्फत केली जाणारी दुर्बिणीतून शस्त्रक्रिया, गर्भ पिशवीची गाठ काढायची, मायोमेक्टोमी ऑपरेशन अशा अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया दाखवण्यात आल्या. या कार्यशाळस शल्य विशारद डॉ वनिता राऊत, डॉ राजेंद्र सकपाळ, डॉ उद्धव राज, डॉ सुयश नवल, डॉ जयनारायण सेनापती आणि डॉ रेखा थोटे हे उपस्थित होते.
ठाणे स्त्री रोग तज्ञ संघटनेचे अध्यक्ष डॉ महेश जोशी, सचिव डॉ नागेश्वरी नंदा, खजिनदार डॉ नुपूर मित्तल तसेच त्यांचे कार्यकारणी सदस्यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते.
स्त्री रोग विभागाचे प्रमुख डॉ जयनारायण सेनापती तसेच त्यांचे सहयोगी प्राध्यापक डॉ. मिसबा मुल्ला, डॉ सुनिता उबाळे, डॉ ममता आनंद आणि हॉस्पिटलचे सर्व निवासी डॉक्टरांचे सहकार्य लाभले. या कार्यशाळेस शंभरहून अधिक स्त्री रोग तज्ञ उपस्थित होते. या कार्यशाळेमुळे नवोदित डॉक्टरांना गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया कशा पद्धतीने केल्या जातात याचे मार्गदर्शन मिळाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर