
ठाणे, 3 डिसेंबर (हिं.स.)। घोडबंदर रोडवरील अपघात आणि त्यामध्ये झालेले मृत्यू याबाबत महानगर पालिकेकडून हायकोर्टाची दिशाभूल करणारी माहिती दिली जात आहे. हेल्मेट नसल्याने मृत्यू झाले, असे कारण पुढे केले जात असले तरी अपघात खड्ड्यांमुळेच झाले आहेत. त्यामुळे ठाणे पालिकेने मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाखांचे अर्थसाह्य द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केले आहे.
घोडबंदर रोडवरील वाढत्या अपघातांमध्ये आणि मृत्युंमध्ये रस्ते खराब असणे, खड्डे आणि वाहतूक कोंडी यांसारखी कारणे आहेत. या वर्षाच्या सुरुवातीपासून ऑक्टोबरपर्यंत १८ जणांचा मृत्यू झाल्याचे ठामपाने उच्च न्यायालयात सांगितले आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयाने ठाणे महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, आणि एमएमआरडीए यांना नोटीस बजावली आहे. याबाबत पत्रकारांशी बोलताना प्रधान यांनी ही मागणी केली.
मनोज प्रधान म्हणाले की, रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात होत आहेत. मात्र, पालिका आणि पोलीस प्रशासन हेल्मेट नसल्याचे कारण पुढे करीत आहे. त्यातही 22 मृत्यू झालेले असताना 18 मृत्यू झाल्याचे सांगून उच्च न्यायालयाची फसवणूक करीत आहे.
मूळात मेट्रो आणि रस्ते रुंदीकरणाच्या कामांमुळे आणि अवजड वाहनांच्या संख्येमुळे प्रचंड वाहतूक कोंडी होते. त्यातच खड्डे प्रचंड असल्याने दुचाकीस्वार पडत आहेत. विशेष म्हणजे, घोडबंदर रोड हा ठामपा, पीडब्ल्यूडी आणि एमएमआरडीए या तीन विभागांच्या अखत्यारीत येत असून रस्त्यांच्या कामात या तिघांमध्ये समन्वयाचा अभाव आहे, ज्यामुळे गैरसोय आणि अपघात होतात. या अपघातांना प्रशासनच जबाबदार असल्याने मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांचे अर्थसाहाय्य द्यावे, असे प्रधान म्हणाले.
दरम्यान, या संदर्भात आपण आयुक्त आणि पोलीस उपायुक्तांची भेट घेणार असल्याचेही प्रधान यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर