रायगड - गोमांस वाहतूक प्रकरणात तिसरी अटक
रायगड, 30 डिसेंबर, (हिं.स.)। बेकायदेशीररित्या गोमांसाची वाहतूक व विक्री केल्याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी कारवाई करत तिसऱ्या फरार आरोपीला अटक केली आहे. यामुळे या प्रकरणातील एकूण आरोपींची संख्या तीनवर पोहोचली आहे. विशेष म्हणजे कोणतीही तांत्रिक मदत क
Absconding driver arrested from Antop Hill; Third arrest in beef smuggling case


रायगड, 30 डिसेंबर, (हिं.स.)। बेकायदेशीररित्या गोमांसाची वाहतूक व विक्री केल्याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी कारवाई करत तिसऱ्या फरार आरोपीला अटक केली आहे. यामुळे या प्रकरणातील एकूण आरोपींची संख्या तीनवर पोहोचली आहे. विशेष म्हणजे कोणतीही तांत्रिक मदत किंवा पूर्व माहिती नसताना, केवळ गोपनीय बातमीदाराच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

काही दिवसांपूर्वी पनवेल शहर पोलिसांनी गोमांसाची बेकायदेशीर वाहतूक करणारे वाहन ताब्यात घेतले होते. यावेळी मोनिउद्दीन शेख (रा. शिवाजीनगर, गोवंडी) आणि पासू उस्मान कुरेशी (रा. मानखुर्द) या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. मात्र वाहनाचा चालक घटनास्थळावरून फरार झाला होता. या फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पनवेल शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने विशेष तपास सुरू केला होता.

तपासादरम्यान फरार आरोपी मोहम्मद अली अकबर अली शहा (रा. अँटॉप हिल, मुंबई) हा अँटॉप हिल परिसरात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस कर्मचारी तुषार बोरसे, मिथुन भोसले, संदेश म्हात्रे आणि शशिकांत काकडे यांनी कौशल्यपूर्ण पद्धतीने सापळा रचून आरोपीला अँटॉप हिल येथून ताब्यात घेतले.

अटक करण्यात आलेला मोहम्मद अली शहा हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर मुंबईतील विविध पोलिस ठाण्यांमध्ये अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पनवेल शहर पोलिसांनी त्याच्याविरोधात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम अंतर्गत कलम ३२५ आणि ३(५) सह इतर संबंधित कलमान्वये कारवाई केली आहे.

या कारवाईमुळे गोमांसाच्या बेकायदेशीर वाहतूक व विक्रीविरोधात पनवेल शहर पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande