
जळगाव , 30 डिसेंबर (हिं.स.) उपविभागीय पोलीस अधिकारी आणि शनिपेठ पोलिसांनी सोमवारी संयुक्त कारवाई करत शहरातील योगेश्वर नगर परिसरात भाड्याच्या घरात सुरू असलेल्या कुंटणखान्यावर छापा टाकला. या कारवाईत देहविक्रीस भाग पाडलेल्या दोन महिलांची सुटका करण्यात आली असून, कुंटणखाना चालविणाऱ्या मुख्य संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
एका भाड्याच्या घरात अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांना मिळाल्यानंतर या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी नियोजनपूर्वक ‘डमी’ ग्राहक तयार केला. संबंधित व्यक्तीशी संपर्क साधल्यानंतर १ हजार ५०० रुपयांत सौदा निश्चित करण्यात आला. डमी ग्राहक घरात प्रवेश करताच पूर्वनियोजित संकेताप्रमाणे मोबाईलवर ‘मिस कॉल’ देत पोलिस पथकाला इशारा देण्यात आला. संकेत मिळताच दबा धरून बसलेल्या पोलीस पथकाने घराला चारही बाजूंनी घेराव घालून छापा टाकला. यावेळी कुंटणखाना चालविणाऱ्या मुख्य संशयिताला ताब्यात घेत पोलिसांनी तेथे अडकवून ठेवलेल्या दोन महिलांची सुरक्षित सुटका केली. भरवस्तीत अशा प्रकारचा बेकायदेशीर व्यवसाय सुरू असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती. या कारवाईनंतर योगेश्वर नगर परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक केले आहे. या प्रकरणी संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, या रॅकेटशी संबंधित इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर