
जळगाव, 30 डिसेंबर (हिं.स.)भुसावळ येथील व्यापाऱ्याने चोपडा येथील व्यापाऱ्यांना दिलेले उसनवारीचे तब्बल २४ लाख रुपये घेऊन येणाऱ्या नोकराला चाकूचा धाक दाखवत लुटल्याची खळबळजनक घटना यावल-चोपडा रस्त्यावरील चुंचाळे फाट्याजवळ घडली. सी.डी.-१०० दुचाकीवर आलेल्या २० ते २२ वयोगटातील दोन अज्ञात तरुणांनी ही धाडसी लूट केल्याने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. भुसावळ येथील प्रभात कॉलनीत राहणारे किरण प्रभाकर पाटील (वय ५३) यांनी यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत ही माहिती दिली आहे.
किरण पाटील हे भुसावळ येथील व्यापारी राजेश पारीख यांच्याकडे खासगी नोकरी करतात. पारीख यांनी चोपडा येथील व्यापाऱ्यांकडे दिलेली उसनवारी परत आणण्याची जबाबदारी पाटील यांच्यावर सोपवली होती. त्यानुसार किरण पाटील हे आपल्या सी.डी.-१०० दुचाकीने (एमएच १९, डीडब्ल्यू ०५४७) चोपडा येथे गेले. चोपडा येथील महालक्ष्मी स्टील येथून ९ लाख ५० हजार, चामुंडा स्टील येथून ११ लाख आणि महाराष्ट्र स्टील येथून साडेतीन लाख रुपये असे एकूण २४ लाख रुपये त्यांनी एका बॅगमध्ये ठेवले. दुपारी पावणेतीन वाजेच्या सुमारास ते यावलच्या दिशेने निघाले. दरम्यान, दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास चुंचाळे ते साकळी दरम्यान चुंचाळे फाट्यापुढे सुमारे १०० मीटर अंतरावर समोरून एक सी.डी.-१०० दुचाकी विरुद्ध दिशेने आली. अपघात टाळण्यासाठी पाटील यांनी दुचाकी थांबवली असता, दुसऱ्या दुचाकीवरील दोन तरुणांनी त्यांच्या पाठीवर अडकवलेली पैशांची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला.पाटील यांनी प्रतिकार केल्यावर त्यातील एकाने खिशातून चाकू काढून ‘जान से मार दूंगा, बॅग दे’ अशी धमकी दिली. त्यानंतर दोघांनी पैशांची बॅग जबरदस्तीने हिसकावून घेतली. याचवेळी पाटील यांच्या खिशातील सॅमसंग कंपनीचा मोबाईल व दुचाकीची चावीही काढून घेऊन दोघे यावलच्या दिशेने दुचाकीवरून पसार झाले. थोड्याच वेळात मागून येणाऱ्या एका दुचाकीस्वाराने पाटील यांची दुचाकी सुरू करून दिली. त्यानंतर पाटील यांनी तात्काळ मालक राजेश पारीख यांना घटनेची माहिती दिली. पारीख हे यावल येथे आल्यानंतर दोघांनी यावल पोलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली.घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली. चोरटे ज्या दिशेने पसार झाले, त्या दिशेने शोधमोहीम राबवण्यात आली. मात्र उशिरापर्यंत चोरट्यांचा माग काढण्यात यश आले नाही. या प्रकरणी यावल पोलिसांनी दोन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर