
बीड, 30 डिसेंबर (हिं.स.
गैरसमज, अहंकार, संशयी वृत्ती किंवा अन्य काही कारणांमुळे पती-पत्नीच्या नात्यात तणाव निर्माण होऊन तुटण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या ११९ संसाराच्या रेशीमगाठी पोलिस अधीक्षक कार्यालयातील बीड जिल्ह्यातील पोलिसांच्या भरोसा सेलने पुन्हा जुळवल्या आहेत.
घटस्फोटाच्या उंबरठ्यावरून माघारी अनेक प्रकरणे घटस्फोटाच्या अंतिम टप्प्यावर असताना भरोसा सेलकडे येतात. तक्रार प्राप्त होताच येथील तज्ज्ञ समुपदेशक आणि महिला अधिकारी दोन्ही बाजूंचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतात. केवळ कायदेशीर कारवाईवर भर न देता संवाद आणि समन्वयाने कुटुंब टिकवण्याला येथे प्रथम प्राधान्य दिले जाते.
प्राप्त बाजूंना ३ ते ४ तारखा देऊन समुपदेशनासाठी बोलावले जाते. त्यांचे वारंवार योग्य कौन्सिलिंग करून मनाचे परिवर्तन करण्याचा आमचा प्रयत्न असतो. पती-पत्नीची तयारी झाल्यावर त्यांच्या इच्छेनेच त्यांना एकत्र नांदायला पाठवले जाते.
भरोसा सेलच्या पोलिस उपनिरीक्षक शालिनी गजभारे यांच्या मार्गदर्शनाखाली ही टीम संवेदनशीलतेने काम करत आहे. यामध्ये प्रत्यक्षात समुपदेशनाचे काम पोलिस हवालदार मोहन क्षीरसागर, सविता सोनवणे, क्षारसागर, सावतार प्रतिभा चाटे, रूपाली ढेंबरे हे पाहतात, तर अनिता माने, मनीषा खरमाटे, मदन जगदाळे आदी कर्मचारी ही जबाबदारी पार पाडत आहेत.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis