
बीड, 30 डिसेंबर (हिं.स.)। बीड शहरातील मुख्य रस्ते, चौक, बाजारपेठा आणि विजेच्या खांबांवर अनधिकृत बॅनर लावल्याने बीडचे विद्रुपीकरण झाले आहे. रस्त्याच्या दुभाजकांवर आणि सिग्नलवर लावलेले बॅनर वाहतुकीस अडथळा ठरत आहेत. काही बॅनर रस्त्यावर झुकल्याने वाहनचालकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. बीडमध्ये 'नाशिक पॅटर्न'ची मागणी करत सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेसमोर निदर्शने करण्यात आली.
आंदोलनकांनी बॅनरबाजी थांबवा अशा घोषणा देत नगर परिषदेच्या भूमिकेचा निषेध केला. या वेळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री अजित पवार यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनात माहिती अधिकार कार्यकर्ते शेख युनूस, शिवशर्मा शेलार, शेख मुबीन, शेख मुस्ताक, डी. जी. तांदळे, नितीन जायभाये, रामधन जमाले, आर. आर. जाधव, अँड. नितीन वाघमारे, रुक्मिणी नागापुरे सहभागी झाल्या होत्या. नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी पदभार घेण्यापूर्वीच कायदे पायदळी तुडवत असल्याचा आरोप केला आहे.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis