
बीड, 30 डिसेंबर (हिं.स.)।
राज्यातील महत्त्वाकांक्षी लातूर-कल्याण द्रुतगती महामार्ग बीड जिल्ह्याच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. या महामार्गात कोणताही बदल करू नये, अशी मागणी बीड जिल्हा ग्राहक पंचायतचे उपाध्यक्ष अनिल बोर्डे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्हाधिकारी बीड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
गेल्या काही दिवसापासून हा मार्ग बदलला जाणार असल्याचे सांगितले जात आहे यावरून मोठे रणकंदन सुरू आहे बीड जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी नवीन मार्गाला पूर्णपणे विरोध केला आहे यामुळे जुन्या मार्गाला कोणताही प्रतिबंध घालू नये अशी मागणी पुढे आली आहे.
लातूर-आंबेजोगाई केज-अहिल्यानगर मार्गे कल्याण असा मूळ प्रस्ताव आहे. तोच मार्ग कायम ठेवावा, अशी मागणी ग्राहक पंचायतने केली आहे.
बीड जिल्हा आधीच दुष्काळ, बेरोजगारी आणि स्थलांतर यासारख्या गंभीर समस्यांना सामोरा जात आहे. अशा वेळी हा महामार्ग जिल्ह्यासाठी संजीवनी ठरणार आहे. या मार्गामुळे मुंबई, पुणे यांसारख्या बाजारपेठांमध्ये माल पाठवणे सोपे होईल.
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis