
बीड, 30 डिसेंबर (हिं.स.)।
बीड जिल्ह्यातील
वाळुंज येथे ३ कोटी २९ लाख रुपयांच्या विविध विकासकामांचा शुभारंभझाला. आमदार सुरेश धस यांच्या विशेष प्रयत्नातून ही कामे मंजूर झाली. युवा नेते सागर धस यांच्या हस्ते या कामांचा प्रारंभ झाला.
या अंतर्गत २ कोटी ५० लाख रुपये खर्चुन संरक्षण भिंत उभारली जाणार आहे. जिल्हा वार्षिक नियोजनातून २९ लाख रुपये आणि प्रादेशिक पर्यटन विकास योजनेतून ५० लाख रुपये मंजूर झाले आहेत. सागर धस यांनी सांगितले की, ग्रामीण भागाचा विकास केवळ रस्ते व इमारतीपुरता मर्यादित नसावा.नागरिकांच्या सुरक्षिततेला आणि रोजगारनिर्मितीला प्राधान्य दिले पाहिजे. उभारण्यात येणारी संरक्षण भिंत गावाला संभाव्य आपत्तींपासून वाचवेल. हे काम दर्जेदार होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पर्यटन विकास योजनेतून श्री भैरवनाथ मंदिराचा परिसर सुशोभित होणार आहे. यात्रेच्या ठिकाणी बदल घडणार आहे. शासनाच्या विविध योजना गावापर्यंत पोहोचवण्यासाठी आमदार सुरेश घस सातत्याने प्रयत्नशील आहेत. पुढील काळात वाळुंजच्या विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असेही सागर धस यांनी सांगितले.
या कामांमुळे वाळुंज परिसरात सुरक्षितता, मूलभूत सुविधा आणि पर्यटन विकासाला चालना मिळणार आहे. गावाच्या सर्वांगीण प्रगतीस हातभार लागणार आहे. या शुभारंभ सोहळ्याचे आयोजन ग्रामपंचायत कार्यालय आणि ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले होते. या वेळी सरपंच विष्णू खाडे, सरपंच सुरेश सातपुते, उपसरपंच बंडु सोले, चेअरमन अशोक राऊत, ज्येष्ठ नेते लालासाहेब शिंदे, डॉ. अनिकेत खाडे, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis