
पुणे, 31 डिसेंबर (हिं.स.)। ‘ॲग्री हॅकॅथान’ च्या माध्यमातून देशातील सर्वोत्तम, गुणवत्तापूर्ण कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यत पोहचवून त्यांच्या उत्पादनात वाढ करणे हा मुख्य उद्देश आहे; ‘ॲग्री हॅकॅथान-२०२६’ च्या आयोजनाच्या अनुषंगाने सर्वसमोवशक सुक्ष्मनियोजन आराखडा तयार करा, अशी सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केली.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ‘ॲग्री हॅकॅथान-२०२६’ आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक योगेश पाटील कृषी महाविद्यालयाचे महानंद माने, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ यांच्यासह विविध संस्थेचे प्रतिनिधी उपस्थित होते.श्री. डुडी म्हणाले, ‘ॲग्री हॅकॅथान २०२६’ च्या आयोजन १५ ते १६ मे २०२६ या कालवधीत करण्याचे नियोजन करावे, याकरिता कृषी क्षेत्राशी निगडित अधिकाधिक स्टार्टअप, नवोकल्पना, कौशल्याधिष्ठित विकास संस्था, तंत्रज्ञानाचा समावेश होईल, यादृष्टीने नियोजन करावे. या उपक्रमाची कृषी क्षेत्राशी निगडित संस्था, माध्यमे, समाज माध्यमे आदींच्या माध्यमातून व्यापक स्वरुपात प्रचार-प्रसिद्धी करण्यात यावी. सहभागी होणाऱ्या स्टॉलधारकांना सुस्थितीत सोई-सुविधा उपलब्ध होईल,याबाबत दक्षता घ्यावी. ॲग्रीहॅकॅथान संकेतस्थळ अद्यायवत करावे. यशस्वी व परिणामकारकरित्या आयोजन करण्याकरिता आयमॅट, बॉम्बे चेंबर ऑफ कॉमर्स, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, नाबार्ड, सिडबी, कृषी विज्ञान केंद्र आदी संस्थांची मदत घेवून त्यांच्या सूचना विचारात घ्यावात.‘ॲग्री हॅकॅथान २०२५’ ची फलश्रुती, यशस्वी उत्पादनांबाबत अधिकाधिक यशकथा करुन शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकऱ्यांपर्यंत पोहचवाव्यात. शेतकऱ्यांना थेट लाभ देण्याच्यादृष्टीने शासकीय अनुदानाचा योजनेत समावेश करण्याची कार्यवाही करावी. त्यापूर्वी सर्व उत्पादने प्रमाणित करण्याकरिता विद्यापीठ किंवा भारतीय कृषी संशोधन संस्थेकडून तपासून घ्यावीत, असेही डुडी म्हणाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु