
छत्रपती संभाजीनगर, 31 डिसेंबर (हिं.स.)।
विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधन वृत्ती आणि नवोन्मेषाला प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमांची गरज आहे. त्यात सहभागी होणारे हे बाल वैज्ञानिक देशाची प्रगती साध्य करण्यासाठी मोठे योगदान देऊ शकतात, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज गणोरी ता. फुलंब्री येथे केले.
५३ वे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन जिल्हा परिषद प्रशाला गणोरी, तालुका फुलंब्री येथे पार पडले. समारोप व पारितोषिक वितरण समारंभाला जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रदर्शनास शिक्षणाधिकारी माध्यमिक श्रीमती अश्विनी लाठकर, उपशिक्षणाधिकारी श्रीमती सीमा म्हेत्रे खैरनार, गटशिक्षणाधिकारी क्रांती धसवाडीकर, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी राजेश महाजन, जिल्हा विज्ञान पर्यवेक्षक दिलीप सिरसाठ, श्रीमती सुनीता वाघ तसेच माध्यमिक शिक्षण विभागातील अधिकारी-कर्मचारी, फुलंब्री तालुक्यातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी प्राथमिक, माध्यमिक व शिक्षक गटातील एकूण ७० प्रयोगाचे निरीक्षण त्यांनी केले. विज्ञान प्रदर्शनाची आठवण चिरकाल राहावी यासाठी माध्यमिक शिक्षण विभाग व भारतीय डाक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने विज्ञान प्रदर्शनाचा लोगो असलेले विशेष डाक तिकीट यावेळी प्रदर्शित करण्यात आले.
जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, विज्ञान प्रदर्शन ग्रामीण भागातील शाळांमध्ये आयोजित करणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे ग्रामीण विद्यार्थ्यांना आपली प्रतिभा सादर करण्यासाठी नवे व्यासपीठ मिळते. विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन, संशोधन वृत्ती आणि नवोन्मेषाला प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमांची गरज आहे, तसेच यामुळे विद्यार्थ्यांच्या संशोधक वृत्तीला चालना मिळून ते देशाच्या प्रगतीत योगदान देऊ शकतात.
प्रास्ताविक शिक्षणाधिकारी माध्यमिक श्रीमती अश्विनी लाठकर यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. सुनील आदिक तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक अनिल देशमुख यांनी केले.
जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा निकाल याप्रमाणे-
प्राथमिक विभागः- १. अक्सा समीर पठाण, हायटेक इंग्रजी शाळा पैठण ,
२.शिवेंद्र प्रमोद काकडे,आर्य चाणक्य विद्या मंदिर पैठण,
३.अमेय तुषार अहिरे,आ. कु. वाघमारे प्रशाला छत्रपती संभाजी नगर ,
प्राथमिक विभाग दिव्यांग-साईराज शिवाजी काकडे,श. भ. सिंह प्राथमिक शाळा सिडको,
माध्यमिक विभागः- १. प्रमोद नारायण पेहरकर, पी.एम.श्री.जी.प.प्रशाला तुर्काबाद खराडी गंगापूर.
२.समीक्षा आबाराव कांजाळकर,स भू विज्ञान महाविद्यालय संभाजीनगर.
३.निखिल पांडुरंग हजारे, न्यू हायस्कूल, दावरवाडी, पैठण
माध्यमिक विभाग दिव्यांग- दाक्षिणी गजानन चंद्रे, पी.एम.श्री.जि. प. प्रशाला गणोरी.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis