नांदेड - गैरप्रकार आढळल्यास परीक्षा केंद्राची मान्यता रद्द करणार - जिल्हाधिकारी कर्डिले
नांदेड, 31 डिसेंबर, (हिं.स.)। मागील वर्षी २०२५ मध्ये झालेल्या परीक्षांतील अनुभव लक्षात घेता, फेब्रुवारी, मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षांदरम्यान कोणत्याही परीक्षा केंद्रावर गैरप्रकार आढळून आल्यास संबंधित कोणाचीही गय केली जाणार
नांदेड - गैरप्रकार आढळल्यास परीक्षा केंद्राची मान्यता रद्द करणार - जिल्हाधिकारी कर्डिले


नांदेड, 31 डिसेंबर, (हिं.स.)। मागील वर्षी २०२५ मध्ये झालेल्या परीक्षांतील अनुभव लक्षात घेता, फेब्रुवारी, मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षांदरम्यान कोणत्याही परीक्षा केंद्रावर गैरप्रकार आढळून आल्यास संबंधित कोणाचीही गय केली जाणार नाही, आवश्यक असल्यास संबंधित परीक्षा केंद्राची मान्यताही रद्द करण्यात येईल, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता समितीचे अध्यक्ष राहुल कर्डिले यांनी दिले.

फेब्रुवारी, मार्च २०२६ च्या परीक्षांच्या अनुषंगाने जिल्ह्यातील माध्यमिक शाळांचे मुख्याध्यापक व कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य यांची संयुक्त पूर्वतयारी आढावा बैठक मातोश्री प्रतिष्ठान इंजिनिअरिंग कॉलेज, खुपसरवाडी (ता. नांदेड) येथे पार पडली. ही बैठक विभागीय मंडळाचे अध्यक्ष सुधाकरराव तेलंग यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी विभागीय मंडळाच्या प्रभारी सचिव अनुपमा भंडारी, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) माधव सलगर, शिक्षणाधिकारी (योजना) दिलीप बनसोडे, संस्थेचे अध्यक्ष कामाजी पवार व सचिव चारी उपस्थित होते.

परीक्षेदरम्यान एखाद्या केंद्रावर गैरप्रकार झाला किंवा त्यास प्रोत्साहन मिळाल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई प्रस्तावित करण्यात येईल. कॉपी करून उत्तीर्ण होणे ही अत्यंत खेदजनक बाब असून, गैरप्रकारातून उत्तीर्ण झालेला विद्यार्थी भविष्यात चांगला नागरिक होत नाही, याची जाणीव सर्वांनी ठेवावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले. आजच्या शिक्षण पद्धतीत अंतर्गत मूल्यांकनाचे २० गुण असून लेखी परीक्षेत ८० पैकी केवळ १५ गुण आवश्यक आहेत. वर्षभरात विद्यार्थ्यांना ही तयारी करून परीक्षा देता येत नसेल, तर त्यावर गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे २०२६ च्या परीक्षेत परीक्षेत कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा सज्जड इशाराच जिल्हाधिकारी कर्डिले यांनी दिला.

जिल्हाधिकारी यांनी २०२५ ०२५ च्या परीक्षेदरम्यान काही केंद्रांवरील अव्यवस्थेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. परीक्षार्थ्यांना बसण्यासाठी ड्युअल डेस्क नाहीत, संरक्षण भिंत नाही, बाहेर मोठया प्रमाणावर गर्दी असते. त्यामुळे ही दहावी, बारावीची परीक्षा आहे की जत्रा, असा भास होतो. अशा शब्दांत त्यांनी परिस्थितीवर भाष्य केले. त्यामुळे २०२६ च्या परीक्षेपूर्वी सर्व परीक्षा केंद्रांनी भौतिक सुविधांची पूर्तता करावी. सर्व परीक्षार्थ्यांना ड्युअल डेस्कची व्यवस्था असावी. सीसीटीव्ही, पिण्याचे पाणी, वीज व्यवस्था, पंखे, लाईट, रॅम्प, कंपाऊंड वॉल आदी सुविधा अनिवार्यपणे उपलब्ध असाव्यात. या सुविधा आढळून आल्या नाही तर संबंधित केंद्र बंद करण्याची शिफारस करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा जिल्हाधिकारी कर्डिले यांनी दिला.

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande