अमरावतीत भाजपच्या तिकीट वाटपावर वाद; हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा संताप
अमरावती, 31 डिसेंबर (हिं.स.) अमरावती महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या तिकीट वाटप प्रक्रियेवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. निष्ठावंत व कट्टर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर भाजपाने अन्याय केल्याचा आरोप करत हिंदुत
अमरावतीत भाजपच्या तिकीट वाटपावर वाद; हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा संताप, राजापेठ कार्यालयात धक्काबुक्की


अमरावतीत भाजपच्या तिकीट वाटपावर वाद; हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांचा संताप, राजापेठ कार्यालयात धक्काबुक्की


अमरावती, 31 डिसेंबर (हिं.स.) अमरावती महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या तिकीट वाटप प्रक्रियेवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. निष्ठावंत व कट्टर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर भाजपाने अन्याय केल्याचा आरोप करत हिंदुत्ववादी संघटनांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. राष्ट्रीय श्रीराम सेनेचे प्रदेशाध्यक्ष कवलजीत पांडे व संगम गुप्ता यांना स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी तिकीट नाकारल्याने हा वाद चिघळला.

या निर्णयाच्या निषेधार्थ आज हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते थेट भाजपाच्या अमरावती येथील राजापेठ कार्यालयात दाखल झाले. यावेळी भाजपाचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी, भाजप प्रदेश सदस्य जयंत डेहनकर व दिनेश सूर्यवंशी यांना संतप्त कार्यकर्त्यांनी जाब विचारला. “निष्ठावंत हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना डावलून पक्षाने भेदभाव केला आहे,” असा आरोप यावेळी करण्यात आला.कार्यालयातच झालेल्या चर्चेला लवकरच तणावपूर्ण वळण लागले. हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि भाजप पदाधिकारी यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. परिस्थिती इतकी बिघडली की वाद थेट धक्काबुक्कीपर्यंत गेला. काही काळ राजापेठ कार्यालयात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.या वेळी हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी गंभीर आरोप करत, भाजप पदाधिकाऱ्यांकडून पैसे घेऊन तिकीट विकले जात असल्याचा दावा केला. “तिकीट हवे असेल तर लाखो रुपये द्यावे लागतील,” अशी मागणी आमच्याकडे करण्यात आल्याचा आरोपही संघटनांच्या कार्यकर्त्यांनी केला. या प्रकारामुळे भाजपच्या अंतर्गत कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे.दरम्यान, या घटनेनंतर अमरावतीच्या राजकीय वर्तुळात तणावाचे वातावरण असून, भाजप नेतृत्वाकडून यावर काय भूमिका घेतली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande