
लातूर, 31 डिसेंबर, (हिं.स.)। अहमदपूर शहरातील अंबिका कॉलनी परिसरात दिवसाढवळ्या घरफोडीची एक मोठी घटना घडली असून, अज्ञात चोरट्यांनी एका बंद घराचे कुलूप तोडून सुमारे २२ लाख ३१ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.
याप्रकरणी गोपाळ मधुसूदन बजाज (वय ४०, रा. अंबिका कॉलनी) यांनी अहमदपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी बजाज हे व्यवसायाने खत दुकानदार असून, त्यांचे घर बंद असताना चोरट्यांनी ही संधी साधली. अज्ञात चोरट्याने घराच्या कपाटाचे लॉक तोडून आत ठेवलेले २६९ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि २ किलो ४९० ग्रॅम चांदीचे दागिने, ज्याची एकूण किंमत २१ लाख ८१ हजार ८०० रुपये आहे, तसेच ५० हजार रुपये रोख असा एकूण २२ लाख ३१ हजार ८०० रुपयांचा ऐवज चोरून नेला.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अरविंद रायबोले , पोलीस निरीक्षक विनोद मैत्रेवार, पोलीस उपनिरीक्षक आनंद श्रीमंगल आणि पोलीस उपनिरीक्षक रवि बुरकूले यांच्यासह डिबी पथकाचे तानाजी आरदवाड , पोकॉ बबन चपडे बिट अमलदार पवार विनोद यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. तपासाला गती देण्यासाठी घटनास्थळी तातडीने फॉरेन्सिक टीम आणि फिंगरप्रिंट (ठसे) तज्ञांना पाचारण करण्यात आले होते, त्यांनी घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे आणि ठसे संकलित केले आहेत. अहमदपूर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर ८३८/२०२५, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३३१(३) आणि ३०५(अ) नुसार अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार हे करत असून भरवस्तीत आणि दिवसा झालेल्या या मोठ्या चोरीमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
नागरिकांनी सतर्क राहावे; आरोपींच्या मुसक्या लवकरच आवळू - पोनि विनोद मेत्रेवार
या घरफोडीच्या तपासाबाबत माहिती देताना पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार म्हणाले की, आम्ही परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत असून तपासासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. फॉरेन्सिक टीमने दिलेले पुरावे तपासाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरतील. आरोपींचा माग काढण्यासाठी सर्व तांत्रिक बाबींचा वापर केला जात असून लवकरच त्यांना अटक करण्यात येईल. नागरिकांनीही घर बंद करून जाताना शेजाऱ्यांना किंवा पोलिसांना कल्पना द्यावी आणि मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवाव्यात.-
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis