
रायगड, 31 डिसेंबर (हिं.स.)। वडखळ पोलीस ठाणे हद्दीत मौजे कासू रेल्वे स्टेशन परिसरात निष्काळजीपणामुळे महावितरण कंपनीच्या भूमिगत विद्युत वाहिनीचे मोठे नुकसान झाल्याची घटना उघडकीस आली आहे. दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 2.38 वाजल्यापासून ते 23 डिसेंबर 2025 रोजी दुपारी 2.38 वाजेच्या दरम्यान ही घटना घडली असल्याचे पोलिस तपासात स्पष्ट झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कासू रेल्वे स्टेशनलगत रेल्वे ट्रॅक ओलांडून गेलेली महावितरण कंपनीची 22 के.व्ही. क्षमतेची, 300 स्क्वेअर एम.एम. जाडीची भूमिगत विद्युत केबल पांडापूर कवच टॉवरच्या जमिन खोदकामादरम्यान फुटली. सदर खोदकाम आरोपी ठेकेदारामार्फत सुरू असताना आवश्यक ती खबरदारी न घेता काम केल्यामुळे ही गंभीर दुर्घटना घडली.
केबल फुटल्यामुळे महावितरण कंपनीची मुख्य विद्युत लाईन खंडित झाली. परिणामी परिसरातील तब्बल 25 गावांतील 27 ट्रान्सफॉर्मरचा वीजपुरवठा पूर्णतः बंद पडला. अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिक, व्यापारी, शेतकरी तसेच लघुउद्योगांना मोठ्या प्रमाणावर गैरसोयीचा सामना करावा लागला.
या घटनेत महावितरण कंपनीच्या विद्युत केबलसह युनिटचे एकूण अंदाजे 8 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम हाती घेतले होते.
या प्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 198/2025 अन्वये भारतीय न्याय संहिता (BNS) 324(3) व 324(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. चव्हाण हे करीत आहेत. निष्काळजीपणे खोदकाम करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके