पेण येथे अतिवेगामुळे भीषण अपघात; दुचाकीस्वार गंभीर जखमी
रायगड, 31 डिसेंबर (हिं.स.)। पेण पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 29 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी सुमारे 7.30 वाजण्याच्या सुमारास मौजे चुनाभट्टी येथील बस स्टॉपच्या पुढे असलेल्या गतीरोधकाजवळ गंभीर अपघात घडल्याची घटना घडली आहे. या अपघातात अतिवेगाने व बेदरकारपणे
पेण येथे अतिवेगामुळे भीषण अपघात; दुचाकीस्वार गंभीर जखमी, कारचालकाविरोधात गुन्हा दाखल


रायगड, 31 डिसेंबर (हिं.स.)। पेण पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 29 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी सुमारे 7.30 वाजण्याच्या सुमारास मौजे चुनाभट्टी येथील बस स्टॉपच्या पुढे असलेल्या गतीरोधकाजवळ गंभीर अपघात घडल्याची घटना घडली आहे. या अपघातात अतिवेगाने व बेदरकारपणे कार चालविणाऱ्या चालकाने पुढे जाणाऱ्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याच्या ताब्यातील ह्युंडाई वेन्यू कार (क्र. एमएच 06 सीएल 2482) ही रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून, अतिवेगाने व हयगयीने चालवली. याच वेळी त्याच दिशेने जाणारी मोटारसायकल (क्र. एमएच 06 बीएच 8987) गतीरोधकाजवळ असताना कारने पाठीमागून धडक दिली. धडकेचा जोर इतका तीव्र होता की दुचाकीस्वार रस्त्यावर फेकला गेला.

या अपघातात फिर्यादी यांना उजव्या पायाच्या मांडीला तसेच उजव्या खांद्याला गंभीर स्वरूपाच्या दुखापती झाल्या आहेत. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीस धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. तसेच दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच पेण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासात कारचालकाचा निष्काळजीपणा व अतिवेग हे अपघाताचे मुख्य कारण असल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 298/2025 अन्वये भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम BNS 329(3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक फौजदार ढोबळे हे करीत असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. वारंवार होणाऱ्या अशा अपघातांमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असून वाहनचालकांनी वेगमर्यादा पाळून सुरक्षित वाहनचालना करावी, असे आवाहन पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande