वाळूमाफियांचा महसूल व पोलिसांच्या पथकावर हल्ला; २० ते २५ जणांवर गुन्हा
जळगाव, 31 डिसेंबर, (हिं.स.) जळगाव जिल्ह्यात वाळू माफियांकडून कारवाईसाठी जाणाऱ्या महसूल व पोलिसांच्या पथकावर होणाऱ्या हल्ल्याच्या घटना काही कमी होताना दिसत नसून अशातच भडगाव तालुक्यातील गिरड परिसरातील गिरणा नदी पात्रातून सर्रास सुरू असलेल्या अवैध वाळ
वाळूमाफियांचा महसूल व पोलिसांच्या पथकावर हल्ला; २० ते २५ जणांवर गुन्हा


जळगाव, 31 डिसेंबर, (हिं.स.) जळगाव जिल्ह्यात वाळू माफियांकडून कारवाईसाठी जाणाऱ्या महसूल व पोलिसांच्या पथकावर होणाऱ्या हल्ल्याच्या घटना काही कमी होताना दिसत नसून अशातच भडगाव तालुक्यातील गिरड परिसरातील गिरणा नदी पात्रातून सर्रास सुरू असलेल्या अवैध वाळू उपशावर कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकाला व पोलिसांवर हल्ला झाल्याची घटना घडली. या प्रकरणी २० ते २५ वाळू माफियांविरुद्ध भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, कारवाईदरम्यान सुमारे ३७ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

गिरणा नदी पात्रात अवैधरित्या गौण खनिज उत्खनन व वाहतूक सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर महसूल सहाय्यक प्रशांत किसन सावकारे, मिलींद निकम, रामकृष्ण मनोरे तसेच भडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांच्या पथकाने सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास शासकीय वाहनातून गस्त सुरू केली. रात्री दहा वाजताच्या सुमारास गिरड–मांडकी रस्त्यावर गिरणा नदीकडून येणारे एक जेसीबी, सोनालिका कंपनीचा ट्रॅक्टर आणि दोन डंपर अवैध वाळूने भरलेले आढळून आले. वाहन चालकांकडे परवाना नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर वाहने तहसील कार्यालयात जमा करण्याचे आदेश देण्यात आले; मात्र चालकांनी अंधाराचा फायदा घेत पलायन केले.थोड्याच वेळात घटनास्थळी २० ते २५ अनोळखी इसम जमा झाले.

दरम्यान पोलिस मदतीसाठी पोलीस कर्मचारी दाखल झाले असताना,काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ वाहनातून आलेल्या रितेश पाटील ऊर्फ आबा (रा. पाचोरा) याने महसूल व पोलिस कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालून धमकी दिली, धक्काबुक्की केली तसेच वाहन जप्तीला विरोध केला. त्याच्या साथीदारांनीही आरडाओरड, शिवीगाळ करत पोलिसांवर दगडफेक केल्याचा आरोप आहे. परिस्थिती गंभीर झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपाने जमाव पळून गेला. यानंतर महसूल व पोलिस पथकाने नवीन चालकांच्या मदतीने सर्व वाहने तहसील कार्यालयात आणून पंचनामा करत जप्त केली. जप्त मुद्देमालात १५ लाखांचे जेसीबी, २ लाखांचा सोनालिका ट्रॅक्टर व किन्ही, प्रत्येकी १० लाखांचे दोन डंपर व त्यातील वाळू असा एकूण ३७.२८ लाख रुपयांचा मुद्देमाल समाविष्ट आहे. या प्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४७८/२०२५ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार ज्ञानेश्वर पाटील करीत आहेत. अवैध वाळू व्यवसायावर कडक कारवाई सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande