रायगड : निष्काळजीपणा करणाऱ्या डॉक्टरांवर गुन्हा दाखल
म्हसाळा येथे झाला होता बालकाचा दुर्दैवी मृत्यू रायगड, 31 डिसेंबर (हिं.स.)। म्हसळा पोलीस ठाणे हद्दीत वैद्यकीय उपचारात झालेल्या निष्काळजीपणामुळे अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली असून, याप्रकरणी दोन डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल कर
वेळीच उपचार न मिळाल्याने बालकाचा मृत्यू; आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह


म्हसाळा येथे झाला होता बालकाचा दुर्दैवी मृत्यू

रायगड, 31 डिसेंबर (हिं.स.)। म्हसळा पोलीस ठाणे हद्दीत वैद्यकीय उपचारात झालेल्या निष्काळजीपणामुळे अल्पवयीन मुलाचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली असून, याप्रकरणी दोन डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटना ६ एप्रिल २०२५ रोजी पहाटे सुमारे १.१० वाजण्याच्या सुमारास उपजिल्हा रुग्णालय, माणगाव येथे घडली.

घुम, ता. म्हसळा येथे राहणाऱ्या फिर्यादी यांचा १४ वर्षीय मुलगा गर्वांग दिनेश गायकर यास दिनांक ०४ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास कमरेच्या खाली पाठीमागील उजव्या बाजूस ‘केसतोडा’चा त्रास सुरू झाला. त्यानंतर त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, म्हसळा येथे नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्यास दाखल करून प्राथमिक उपचार केले. उपचारानंतर तब्येत बरी वाटल्याने फिर्यादी यांनी मुलाला घरी नेले.

मात्र काही वेळानंतर पुन्हा त्रास वाढल्याने त्यास पुन्हा ग्रामीण रुग्णालय, म्हसळा येथे आणण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तपासणी करून पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, माणगाव येथे रुग्णास रेफर केले. माणगाव येथील रुग्णालयात कर्तव्यावर असलेला आरोपी क्रमांक १ हा गैरहजर राहिला असून, त्याने आपले कर्तव्य आरोपी क्रमांक २ याच्याकडे सोपवले होते. आरोपी क्रमांक २ यांनी मयत बालकास चुकीच्या पद्धतीने उपचार दिले, तसेच आरोपी क्रमांक १ यांच्या अनुपस्थितीमुळे योग्य व वेळेवर उपचार मिळाले नाहीत.

दोन्ही आरोपी डॉक्टरांनी केलेल्या हयगयी व निष्काळजीपणामुळे गर्वांग गायकर याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचा आरोप फिर्यादी यांनी केला आहे. या प्रकरणी म्हसळा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १०९/२०२५ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०६(१) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. रोहणीकर हे करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके


 rajesh pande