
कोल्हापूर, 31 डिसेंबर (हिं.स.)।
येथील डॉ. पद्मा रेखा शिशिर जिरगे यांची फर्टिलिटी अँड रिप्रोडक्शन या नियतकालिकाच्या मुख्य संपादक म्हणून नियुक्ती झाल्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठा सन्मान मिळाला आहे. हे नियतकालिक अशिया पॅसीफिफ इंटीटीव्ह ऑन रिप्रॉडक्शनचे अधिकृत जर्नल असून ग्लोबल साउथमधील सर्वाधिक प्रतिष्ठित नियतकालिकांपैकी एक आहे. ही नियुक्ती त्यांच्या प्रदीर्घ व उल्लेखनीय शैक्षणिक आणि व्यावसायिक कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा ठरली आहे.
फर्टिलिटी अँड रिप्रोडक्शन या नियतकालिकाला जागतिक स्तरावर मोठा वाचकवर्ग असून पुनरुत्पादन वैद्यकशास्त्रातील दर्जेदार संशोधन प्रकाशित केले जाते. मध्य पूर्व, दक्षिण व आग्नेय आशिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जपान आणि चीन अशा विस्तृत आशिया-पॅसिफिक प्रदेशातील संशोधन या जर्नलमध्ये समाविष्ट असते. डॉ. जिरगे १ जानेवारी २०२६ पासून अधिकृतपणे ही जबाबदारी स्वीकारणार आहेत. यापूर्वी त्यांनी
इंडियन सोसायटी ऑफ असीस्टेड
रिप्रॉडक्शनच्या जर्नल ऑफ ह्यूमन रिप्रॉडक्टीव्ह सायन्सेस
या नियतकालिकाच्या मुख्य संपादक म्हणून कार्य केले असून त्यानंतर फर्टिलिटी अँड रिप्रोडक्शनच्या उपसंपादक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. त्यांची ही नियुक्ती प्रजनन व पुनरुत्पादन विज्ञान क्षेत्रातील त्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय योगदानाची तसेच जैववैद्यकीय संशोधनातील वैद्यकीय, कायदेशीर व नैतिक बाबींच्या सखोल ज्ञानाची पोचपावती आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar