
अमरावती, 31 डिसेंबर (हिं.स.) वरखेड महावितरण उपकेंद्रांतर्गत येणाऱ्या सर्व गावांतील बागायतदार शेतकऱ्यांना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलेल्या धोरणानुसार दिवसा वीजपुरवठा तात्काळ सुरू करावा, या ठाम मागणीसाठी तालुक्यातील शेतकरी बांधवांनी महावितरणचे उपकार्यकारी अभियंता निलेश उईके यांना निवेदन सादर केले.
वरखेड फिडर अंतर्गत येणाऱ्या वरखेड, उंबरखेड, धामंत्री, निंबोरा, भारवाडी, ठाणाठुनी, चांदूर ढोरे, भारसवाडी आदी गावांतील शेतकऱ्यांनी या निवेदनाद्वारे गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधले आहे. सध्या संत्रा, चणा व गहू या पिकांना ओलीताची अत्यंत गरज असताना रात्रीच्या वेळेतील वीजपुरवठ्यामुळे ओलीत करणे अशक्य बनले आहे.
शेतकऱ्यांनी सांगितले की, संबंधित परिसरात बिबट्याचा मुक्त संचार वाढलेला असून रात्री शेतात जाणे म्हणजे जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. अनेक शेतकरी भीतीच्या वातावरणात शेती करीत असून ही परिस्थिती अत्यंत गंभीर व चिंताजनक आहे. त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांनी दिलेल्या आश्वासनानुसार दिवसा वीज उपलब्ध करून देणे अत्यावश्यक आहे. यावेळी शेतकऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला की, जर लवकरात लवकर दिवसा वीजपुरवठा सुरू करण्यात आला नाही, तर महावितरण कार्यालयावर तीव्र आंदोलन करण्यात येईल, आणि त्या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी कंपनी प्रशासनाची राहील.
या वेळी तालुक्यातील विजय उंदरे, शुभम ढगे, निलेश निंभोरकर, रोशन पोहेकार, रामकृष्ण गावनार, नितीन दिघळे, किशोर राऊत, प्रशांत दिघडे, सुशील लांडे, मंगेश लांडे, श्याम बोकडे, प्रशांत ठाकरे, हरिभाऊ कावडे, विलास हांडे, अविनाश गंधे, नितीन तालन, विनोद पोहेकार, जयकुमार बोके, प्रमोद परिसे, नरेश मेश्राम, प्रमोद पांडव, गजानन नांदणे, जनार्दन इंगळे, विलास गाडगे, दिलीप चौबे, सागर ढोरे, प्रवीण बनसोड, चंद्रशेखर कडू, वासुदेव केवदे, गजानन मोहोळ, देवा लांजेवर, सुरेश जोमदे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी