
आमदारांच्या कार्यालयासमोर डफडी बजाव आंदोलन, सरकारला इशारा
अमरावती, 31 डिसेंबर (हिं.स.)
चांदुर बाजार तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अद्यापही शासनाचा मंजूर निधी न मिळाल्याने शेतकऱ्यांचा संयम संपला असून, आज लोकविकास संघटनेच्या नेतृत्वाखाली बहुसंख्य शेतकऱ्यांनी स्थानिक आमदार मा. श्री. प्रवीण तायडे यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर डफडी बजाव आंदोलन करून राज्य सरकार व जनप्रतिनिधींचे लक्ष वेधण्याचा तीव्र प्रयत्न केला.जून ते सप्टेंबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शासनाने मदत जाहीर करूनही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात आजतागायत एक रुपयाही जमा झालेला नाही. केवायसी, कागदपत्रे, पाठपुरावा करूनही निधी मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.या आंदोलनाचे नेतृत्व लोकविकास संघटनेचे संस्थापक अध्यक्ष गोपाल भालेराव यांनी केले. डफडी वाजवत शेतकऱ्यांनी महायुती सरकारचा जोरदार निषेध केला.“शेतकरी रडतोय आणि सरकार झोपले आहे. तातडीने अतिवृष्टीचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावा, अन्यथा याहीपेक्षा उग्र आंदोलन छेडले जाईल,” असा थेट इशारा यावेळी देण्यात आला.सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत, जनप्रतिनिधींनी केवळ निवडणुकीच्या वेळीच शेतकऱ्यांची आठवण काढू नये, अशी संतप्त भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.वेळीच निर्णय न झाल्यास आंदोलनाची तीव्रता वाढवून शेतकऱ्यांना घेऊन तीव्र स्वरूपाचा लढा उभारण्यात येईल, असा निर्धार यावेळी शेतकऱ्यांनी केला. या आंदोलनामध्ये रमन लंगोटे, आकाश खेलदार, ऋषिकेश रडके, संविधान मोहोळ जावेद पठाण, विजय बाटे, विकास आवारे सागर सोनारे, प्रवीण तडस, गौरव वैद्य, स्वप्निल रखे, इमरान सौदागर, गौरव उल्हे,शाम पारीसे, सोपान पोहोकार, मदन बुदुडे, अशोकराव बंड यांच्यासह बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी