
रायगड, 31 डिसेंबर (हिं.स.)। माणगाव पोलीस ठाणे हद्दीत पुणे–माणगाव रोडवरील ताम्हिणी घाट परिसरात भरधाव ट्रकच्या निष्काळजी वाहनचालकामुळे मोटार अपघाताची घटना घडली आहे. दिनांक ३० डिसेंबर रोजी पहाटे सुमारे ०५.३० वाजण्याच्या सुमारास मौजे सणसवाडी गावच्या हद्दीत असलेल्या वळणावर हा अपघात झाला.
पुणे जिल्ह्यातील कोंडवा येथील साईबाबानगर, दारुल अमन बिल्डींग, फ्लॅट क्रमांक ०१ येथे राहणारे प्रवासी आपल्या कारने पुणे–माणगाव रोडने ताम्हिणी घाट उतरून माणगावकडे येत असताना समोरून येणाऱ्या एका अनोळखी ट्रकने रॉंग साईडने येत थेट कारला समोरासमोर जोरदार धडक दिली. या धडकेत कारमधील प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अपघातानंतर संबंधित ट्रकचालकाने कोणतीही मदत न करता तसेच मोटार अपघाताची माहिती पोलिसांना न देता घटनास्थळावरून पळ काढल्याचे समोर आले आहे. सदर घटनेमुळे ताम्हिणी घाट परिसरात काही काळ वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता.
या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ३३१/२०२५ नुसार मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम १३४ व १८४ तसेच भारतीय न्याय संहिता कलम १२५ (अ) व २८१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातास कारणीभूत ठरलेल्या अनोळखी ट्रकचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व प्रत्यक्षदर्शींच्या आधारे तपास केला जात आहे.
या घटनेमुळे घाट परिसरातील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, भरधाव व निष्काळजी वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. अधिक तपास माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके