
रायगड, 31 डिसेंबर (हिं.स.)। माणगाव पोलीस ठाणे हद्दीत मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावर वारक फाटा परिसरात अज्ञात मोटारसायकलस्वाराने धडक देऊन पळ काढल्याची घटना घडली असून, या अपघातात एका पादचाऱ्यास गंभीर दुखापत झाली आहे.
करंजेवाडी, पानसई आदिवासीवाडी, पो. तळशेत, ता. माणगाव येथे राहणारे फिर्यादी हे मुंबई–गोवा महामार्ग ओलांडत असताना अज्ञात मोटारसायकलस्वाराने त्याच्या ताब्यातील दुचाकी भरधाव व निष्काळजीपणे चालवत रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून थेट फिर्यादीस जोरदार धडक दिली. या धडकेत फिर्यादीच्या उजव्या व डाव्या पायाला गंभीर स्वरूपाच्या दुखापती झाल्या असून, ते रस्त्यावर कोसळले.
अपघातानंतर संबंधित दुचाकीस्वाराने कोणतीही मदत न करता तसेच अपघाताची माहिती पोलिसांना न देता घटनास्थळावरून पळ काढल्याचे निष्पन्न झाले आहे. अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. स्थानिक नागरिकांनी जखमी व्यक्तीस तातडीने उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले.
या प्रकरणी माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ३३२/२०२५ नुसार मोटार वाहन अधिनियम १९८८ चे कलम १८४ व १३४ तसेच भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५(अ) व १२५(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात मोटारसायकलस्वाराचा शोध घेण्यासाठी पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून, प्रत्यक्षदर्शींची माहिती संकलित केली जात आहे.
मुंबई–गोवा महामार्गावर वारंवार होणाऱ्या अशा हिट अँड रन घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. सदर प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार होडशीळ हे करीत आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके