
जळगाव, 31 डिसेंबर (हिं.स.) जळगाव जिल्ह्यात जल जीवन मिशन अंतर्गत जिल्हा परिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध पाणीपुरवठा योजनांच्या प्रगती, गुणवत्ता व प्रत्यक्ष अंमलबजावणीचा जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात सविस्तर आढावा घेण्यात आला.
या बैठकीत रावेर, चोपडा व यावल तालुक्यातील आदिवासी पाड्यांमध्ये पाणीपुरवठा योजना प्रत्यक्ष कार्यान्वित आहेत
की नाहीत, याची स्थळनिहाय खात्री करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच जिल्ह्यातील शाळा व अंगणवाडी केंद्रांमध्ये
नियमित व सुरक्षित पाणीपुरवठा होत आहे की नाही, याची तत्काळ तपासणी करून अहवाल सादर करण्याबाबत
संबंधित अधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले.
पाणीपुरवठ्यातील अडचणी, पाणीस्रोतांची स्थिती, भूजल उपलब्धता तसेच तांत्रिक बाबींच्या अनुषंगाने आवश्यक
तातडीच्या उपाययोजना राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. “हर घर नल, हर घर जल” या उद्दिष्टाच्या
पूर्ततेसाठी कामांची गुणवत्ता, कालमर्यादा व विविध यंत्रणांमधील समन्वयावर विशेष भर देण्यात आला.
या बैठकीस कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, जिल्हा परिषद जळगाव, विविध
तालुक्यांतील उप अभियंते, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे अधिकारी तसेच भूजल सर्वेक्षण विभागाचे वरिष्ठ भू-
वैज्ञानिक उपस्थित होते.
या आढावा बैठकीद्वारे ग्रामीण व आदिवासी भागातील नागरिकांना सुरक्षित व शाश्वत पिण्याच्या पाण्याची उपलब्धता
सुनिश्चित करण्यासाठी संबंधित सर्व यंत्रणांनी जबाबदारीने व कालबद्ध पद्धतीने कार्यवाही करण्याच्या सुचना देण्यात
आल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर