
नांदेड, 31 डिसेंबर (हिं.स.)। महानगरपालिका निवडणुक निवडणूक शांततेत, भयमुक्त आणि निःपक्षपणे पार पाडण्यासाठी जिल्हा पोलिस प्रशासनाने बंदोबस्ताचे नियोजन केल्याचे पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
शहरात एकूण २० प्रभाग असून, २०० इमारतीत ६०० मतदान केंद्रे आहेत. निवडणूक प्रक्रियेच्या अनुषंगाने शहरातील सहा पोलिस ठाण्याअंतर्गत प्रत्येक तीन ठाण्यांसाठी एक अपर पोलिस अधीक्षक यांची बंदोबस्त देखरेख अधिकारी, तर प्रत्येक ठाण्याच्या हद्दीसाठी एक पोलिस उपअधीक्षक बंदोबस्त प्रभारी अधिकारी म्हणून, तर संबंधित ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक बंदोबस्त प्रभारी
अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. निवडणूक आयोग आणि पोलिस विभागातर्फे शहरात पाच ठिकाणी 'एसएसटी' पथक, तर २० प्रभागांमध्ये सात भरारी पथके नेमण्यात आली आहेत. शहरातील सर्व ठाण्यांच्या हद्दीत रूट मार्च काढण्यात येणार असून, आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रत्येक ठाण्यामध्ये दंगा नियंत्रणाची रंगीत तालीम सुरू आहे.
महानगरपालिका निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी एक पोलिस अधीक्षक, दोन अपर पोलिस अधीक्षक, सात उपविभागीय पोलिस अधिकारी, २१ पोलिस निरीक्षक, १४८ पोलिस अधिकारी, १,४८३ पोलिस अंमलदार, १२ दंगा नियंत्रण पथके, २० स्ट्रायकिंग फोर्स, दोन राखीव पोलिस बल कंपन्या आणि १,३५० होमगार्ड असा मोठा बंदोबस्त तैनात असणार आहे.
याशिवाय सुमारे ९६ मोहल्ला कमिटी बैठका आयोजित केल्या असून, या बैठका पोलिस अधीक्षक, अपर पोलिस अधीक्षक, सहा उपविभागीय पोलिस अधिकारी व पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी घेणार आहेत. शांतता समित्या, कॉर्नर बैठका व प्रतिष्ठित नागरिकांच्या बैठकींतून जनजागृती करून नागरिकांना पोलिस प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis