
रायगड, 31 डिसेंबर (हिं.स.)। सरत्या वर्षात रायगड पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने उल्लेखनीय कामगिरी करत गुन्हेगारी प्रवृत्तीवर प्रभावी अंकुश बसवला आहे. जानेवारी ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची उकल करण्याबरोबरच अवैध धंद्यांविरोधात कठोर कारवाई करत पोलिसांनी कायदा-सुव्यवस्था अधिक बळकट केली आहे.
या ११ महिन्यांत खून, दरोडा, घरफोडी, चेन स्नॅचिंग व चोरी अशा एकूण ४० गंभीर गुन्ह्यांची उकल करण्यात आली असून ४६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईत २ कोटी ८४ लाख २३ हजार ७९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून जवळपास १०० टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले आहे.
अवैध धंद्यांविरोधात राबवलेल्या मोहिमेत ४९ गुन्ह्यांची नोंद करून ४१ आरोपींना अटक करण्यात आली. यामध्ये तब्बल ७ कोटी ७५ लाख २१ हजार ४८३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेषतः अमली पदार्थ, जुगार, अवैध दारू, गुटखा व शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत कारवायांनी गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.
गुन्ह्यानुसार तपशील पाहता, खूनप्रकरणी ४ गुन्ह्यांत ७ आरोपी, दरोड्यात ३ गुन्ह्यांत १४ आरोपी अटक झाले असून सुमारे १.५१ कोटींचा मुद्देमाल जप्त व परत करण्यात आला आहे. घरफोडीच्या १५ गुन्ह्यांत ८ आरोपींना अटक करून १.१७ कोटींचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच चोरीचे १६ गुन्हे उघडकीस आणत १६ आरोपींना अटक झाली आहे.
रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर पोलीस दल अधिक कार्यक्षम बनवण्यावर भर दिला. स्थानिक गुन्हे शाखेची जबाबदारी पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे यांच्याकडे दिल्यानंतर अनेक गंभीर गुन्ह्यांची उकल झाली. देशभरात बंदी असतानाही सुरू असलेल्या ऑनलाईन मटक्याचा पर्दाफाश करून स्थानिक गुन्हे शाखेने आपल्या कामगिरीत मानाचा तुरा खोवला आहे. या सातत्यपूर्ण कारवायांमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक दृढ झाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके