
सोलापूर, 31 डिसेंबर (हिं.स.)।
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयास गेल्या काही दिवसांपासून अकृषिक रेखांकनातील खुल्या जागा (ओपन स्पेस) बेकायदेशीरपणे विकल्या जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या गंभीर विषयावर जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. सोलापूर जिल्ह्यातील खुल्या जागांच्या बेकायदेशीर खरेदी-विक्री व्यवहारांच्या नोंदी रद्द करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.
या बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी गणेश निराळी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, तहसीलदार महसूल दिनेश पारगे, तहसीलदार बार्शी एफ आर शेख तसेच सहाय्यक संचालक नगररचना विभाग, अधीक्षक भूमी अभिलेख श्री. घोडके आणि दुय्यम उपनिबंधक उपस्थित होते.
जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सांगितले की, नियमानुसार मंजूर रेखांकनातील खुल्या जागांची खरेदी-विक्री करता येत नाही. तरीदेखील काही विकसकांकडून अशा जागांचे बेकायदेशीर व्यवहार होत असल्याचे तक्रारींमधून स्पष्ट झाले आहे. हे प्रकार थांबवण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी दक्षता घेणे आवश्यक असल्याचे निर्देश त्यांनी दिले. जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी सर्व तहसीलदारांना आपल्या स्तरावर बैठक घेऊन तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्याचे आदेश दिले. खुल्या जागेच्या बेकायदेशीर खरेदी-विक्री झाल्यास अशा व्यवहारांच्या नोंदी रद्द करण्यात याव्यात तसेच संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड