
औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न तीव्र
पालघर, 4 डिसेंबर (हिं.स.)।
पालघर जिल्ह्यातील तारापूर औद्योगिक वसाहत गेल्या काही वर्षांत अपघात, रासायनिक गळती आणि आगीच्या घटना यामुळे सतत चर्चेत राहिली आहे. गेल्या पाच वर्षांत येथे तब्बल ९१ अपघात घडले असून ४८ कामगारांना जीव गमवावा लागला आहे. वाढत्या दुर्घटनांमुळे या वसाहतीतील औद्योगिक सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.
तारापूर एमआयडीसीत सुमारे १,८०० उद्योग कार्यरत आहेत. मात्र अनेक कारखान्यांकडे आवश्यक अग्निशमन साधने, गॅस सेन्सर, आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग आणि आधुनिक सुरक्षा प्रणालींचा अभाव असल्याचे वारंवार समोर येत आहे. काही कंपन्यांत कामगारांवर अतिरिक्त कामाचा ताण, जुनाट यंत्रसामग्रीचा वापर आणि प्रशिक्षित सुरक्षा अधिकाऱ्यांचा अभाव ही परिस्थिती अधिक गंभीर करणारी कारणे ठरत आहेत.
रासायनिक कारखान्यांमध्ये सुरक्षा ऑडिट वेळेवर न होणे, नियमांचे शिथिल पालन, कामगारांना प्रशिक्षणाचा अभाव आणि गळती–स्फोटांच्या तक्रारी यामुळे धोका वाढत असल्याची निरीक्षणे नोंदली गेली आहेत. परिणामी वायूगळती, रासायनिक गळती, आग आणि स्फोटांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही.
औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे सहसंचालक माधव तोटेवाड म्हणाले की, “नियमावलीचे पालन व्हावे यासाठी विभाग प्रयत्नशील असून कारखान्यांना सुरक्षा प्रशिक्षण, कार्यशाळा आणि प्रात्यक्षिके देण्याची प्रक्रिया सुरू आहे. अपघात कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविल्या जात आहेत.”
तारापूरच्या वाढत्या औद्योगिक प्रगतीसोबतच कामगारांचे संरक्षण, नियमांचे काटेकोर पालन व नियमित तपासणी ही गरज अधिक तीव्र होत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL