
पालघर, 4 डिसेंबर (हिं.स.)। डहाणू नगरपरिषद निवडणुकीत २७ तृतीयपंथीयांनी उत्साहाने मतदानाचा हक्क बजावला. प्रभागानुसार ठिकठिकाणी जाऊन त्यांनी सकाळपासून केंद्रांवर रांगेत उभे राहत मतदान केले. मतदानानंतर त्यांनी अभिमानाने सेल्फी व व्हिडिओही काढले. मात्र सायंकाळी निवडणूक यंत्रणेने जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीत केवळ एकाच तृतीयपंथी मतदाराची नोंद असल्याचे स्पष्ट झाल्याने तृतीयपंथीय समाजात प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे.
अधिकारी वर्गाच्या चुकांमुळे उर्वरित सर्व तृतीयपंथीय जनतेची नोंद ‘महिला’ मतदार म्हणून करण्यात आली. सामाजिक कार्यकर्त्या उज्ज्वला डामसे यांनी सांगितले की, सात वर्षांपूर्वी डहाणूत ४० तृतीयपंथीयांची ओळख नोंदविण्यासाठी विशेष उपक्रम राबवला होता. त्यांचे आधारकार्ड, बँक खाते आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली होती. अशा परिस्थितीत निवडणूक यंत्रणेने आजही तृतीयपंथीयांची योग्य नोंद न करता लोकशाहीचा अपमान केल्याचा आरोप त्यांनी केला.
सध्या डहाणूत जवळपास ३०–३२ तृतीयपंथी वास्तव्यास असून त्यापैकी बहुतेक शिक्षित आहेत. तरीही मतदारयादीत काहींची नोंद ‘महिला’ म्हणून आहे, यामुळे त्यांना अजूनही समाजात स्वीकार मिळत नसल्याची वेदना प्रकर्षाने जाणवत असल्याचे रेश्मा पवई यांनी सांगितले.
“लोकशाही मजबूत करण्यासाठी आम्ही मतदानाचा हक्क बजावतो; परंतु यंत्रणेकडून योग्य ओळख मिळत नाही. आम्हाला न्यायासाठी अजून किती वाट पाहावी लागणार?” असा सवाल तृतीयपंथीयांनी उपस्थित केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL