
अमरावती, 4 डिसेंबर (हिं.स.)
महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघांसाठी 1 नोव्हेंबर 2025 या अर्हता दिनांकावर आधारित नवीन मतदार यादी तयार करण्याचे सुधारित वेळापत्रक भारत निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. त्यानुसार अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी बुधवार, 3 डिसेंबर 2025 रोजी करण्यात आली आहे.
मतदार यादीची प्रत विभागीय, जिल्हा, उपविभागीय व तहसील स्तरावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे, असे अपर आयुक्त संजय जाधव यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारेकळविले आहे. मतदार नोंदणी अधिनियम, 1960 नुसार या पुनरिक्षण कार्यक्रमाचे टप्पे आखण्यात आले आहे. त्यानुसार हस्तलिखिते तयार करणे आणि प्रारुप मतदार याद्यांची छपाईदि. 28 नोव्हेंबर, 2025 रोजी करण्यात आली आहे. तसेच आज दि. 3 डिसेंबर 2025 रोजी प्रारुप मतदार याद्यांची प्रसिध्दी करण्यात आली आहे. मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 12 अंतर्गत, मतदार याद्यांवर 3 ते 18 डिसेंबर 2025 या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येतील. तसेच दावे व हरकती 5 जानेवारी 2026 रोजी निकाली काढण्यात येतील. याच दिवशी पुरवणी यादी तयार करणे व छपाई करण्यात येणार आहे. उक्त दावे व हरकतीचा कालावधी संपल्यानंतर दि. 12 जानेवारी 2026 रोजी अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची अंतिम मतदार यादी प्रसिध्दी करण्यात येईल. मतदार नोंदणी अधिनियम 1960 मधील नमूना 5 नुसार प्रारुप मतदार यादी प्रसिध्दीची सूचना प्रसिध्दी करण्यात आलेली आहे. तसेच मतदार नोंदणीमध्ये अद्याप पात्र शिक्षक नाव नोंदणी करण्याचे कोणी राहीले असल्यास किवा इच्छुक असल्यास अमरावती विभाग शिक्षक मतदार संघामध्ये नोंदणी करु शकतात, असे कळविण्यात आले आहे.------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी