
पुणे, 4 डिसेंबर (हिं.स.)।
कोरेगाव भीमा चौकशी आयोगापुढे राज्याचे माजी मुख्यमंत्री, शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे येत्या ७ जानेवारी वकिलांमार्फत म्हणणे मांडणार आहेत. ठाकरे यांना कोरेगाव भीमा चौकशी आयोगाने ‘कारणे दाखवा‘ (शो-काॅज) नोटीस बजावली होती. वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी दाखल केलेल्या अर्जासंदर्भात ही नोटीस बजाविण्यात आली आहे. त्यानुसार ठाकरे यांना आयोगापुढे समक्ष किंवा त्यांच्या प्रतिनिधीमार्फत उपस्थित राहण्याचे आदेश आयोगाने दिले होते. मात्र, ठाकरे मंगळवारी सुनावणीसाठी अनुपस्थित राहिले होते. त्यामुळे आंबेडकर यांच्या वतीने ॲड. किरण कदम यांनी ठाकरे यांच्यावर वाॅरंट बजाविण्यात यावे, असा अर्ज आयोगाला मंगळवारी दिला होता. यासंदर्भात सुनावणी होणार होती. या दरम्यान, ठाकरे यांच्या वतीने ॲड. असीम सरोदे यांनी वकिलपत्र दाखल केले. यासंदर्भात म्हणणे मांडण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी ॲड. सरोदे यांनी आयोगाकडे केली. त्यानुसार आयोगाने त्यांना ७ जानेवारी रोजीची मुदत दिली असून या दिवशी ठाकरे त्यांचे म्हणणे मांडणार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु