
चंद्रपूर, 4 डिसेंबर (हिं.स.)।
येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात असलेल्या काही परवानाधारक दुकानदाराला प्रशासकाच्या आशिर्वादाने करारात कोणताही तरतूद नसतांना फळे व भाजीपाला ठेवण्यासाठी शितचेंबरला परवानगी देण्यात आली. त्यामुळे इतर दुकानदारांवर हा सर्वात मोठा अन्याय आहे. तसेच या परिसरात बाहेरुन येणार्या ग्राहकांना तसेच शेतकर्यांच्या सुविधेसाठी कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे या ठिकाणी येणार्यांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागतो. यासंदर्भात अनेकदा निवेदन देऊन सुध्दा कोणतीही दखल घेण्यात आली नाही. तरी कृउबासच्या सर्व संचालक मंडळांनी याकडे लक्ष देऊन त्वरित उपाययोजना करावी अशी मागणी येथील फळविक्रेते मो. करीम मो. जहीर यांनी पत्रपरिषदेच्या माध्यमातून केली आहे.
कृषी उत्पन्न बाजार समिती ही शहरातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. या ठिकाणी भाजीपाल्यासोबतच फळांचा व्यापारही मोठ्या प्रमाणात होत असतो. त्यामुळे दररोज या ठिकाणी लाखोंचा व्यवहार होत असतो. तसेच ग्राहकांची संख्याही मोठ्या प्रमाणात असते. परंतू सध्या या ठिकाणी गैरव्यवहार मोठ्या प्रमाणात होत असतो अनेक नियम डावलून येथील संचालक मंडळ काही ठराविक दुकानदारांना शितचेंबर सुरु करण्याची परवानगी देत आहे. खरे तर दुकानाचे गाळे देतांना याबाबत कुठलाही करार केला नसतांना याकडे कानाडोळा करण्यात येत आहे. तसेच हा खुप मोठा परिसर असून या ठिकाणी काही बाहेरच्या दुकानदारांनी आपल्या दुकानाचा अवाका वाढवित अतिक्रमण केले आहे. याकडेही संचालक मंडळाचे दुर्लक्ष होतांना दिसत आहे. तसेच या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून येथे व्यवसायासाठी येणार्या व्यापार्यांना व ग्राहकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच शेतकरी आपला माल विकण्यासाठी या ठिकाणी बाहेरगावावरुन येत असतात त्यांच्या सोयीसाठी निवासाची, स्वच्छतागृहाची येथे सोय उपलब्ध नसल्याने अनेकांना गैरसोयीमुळे त्रास सहन करावा लागतो. या व अश्या मागण्यांसदर्भात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळांना निवेदन देऊन सुध्दा याकडे कानाडोळा करण्यात येत असून व्यवसायिकांना आपला व्यवसाय कसा करावा असा प्रश्न निर्माण झाला आहे. यासंदर्भात ठोस उपाययोजना करुन येथे व्यवस्था निर्माण करावी व नियमबाह्य उपक्रमांना आळा घालण्यात यावा अशी मागणी पत्रपरिषदेच्या माध्यमातून मो. करीम मो. जहीर यांनी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव