
पालघर, 4 डिसेंबर (हिं.स.)।
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे (MSRLM) मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश सागर यांनी गुरुवारी पालघर तालुक्यातील विविध स्वयंरोजगार गटांचा प्रत्यक्ष दौरा करून त्यांच्या कार्यपद्धतीचा सविस्तर आढावा घेतला. उत्पादनातील सातत्य, गुणवत्ता, प्रशिक्षण प्रक्रिया, आर्थिक स्थिती तसेच बाजारपेठ जोडणी याबाबत मार्गदर्शन करत महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणावर विशेष भर देण्यात आला.
दौऱ्याची सुरुवात स्वामिनी उद्योग समूहाच्या भेटीने झाली. उत्पादन प्रक्रिया, पॅकेजिंग, गुणवत्ता नियंत्रण, विक्रीची सद्यस्थिती आणि नफा–तोटा तक्ता यांची निलेश सागर यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. स्थानिक बाजारपेठेबरोबर जिल्हा व राज्य पातळीवर उत्पादने पोहोचविण्यासाठी धोरणात्मक नियोजन करण्याचे निर्देश देत महिलांना सक्षम करण्यासाठी काही ठोस सूचना त्यांनी केल्या.
यानंतर BRC/SVEP केंद्रात उद्योजकता विकासासाठी राबविल्या जाणाऱ्या प्रशिक्षण उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. कौशल्यवृद्धी, आर्थिक सहाय्य, मार्गदर्शन, व्यवसायासाठी आवश्यक मूलभूत माहिती आणि बाजारपेठ जोडणी यावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचे आदेश सागर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
वडराई येथील मासे विक्री उत्पादक गटाच्या भेटीदरम्यान दैनंदिन विक्री पद्धती, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था, साठवण क्षमता आणि उत्पन्नाची स्थिती त्यांनी पाहिली. व्यवसाय अधिक शाश्वत व नफा देणारा करण्यासाठी सुधारित सुविधा, स्वच्छता मानके आणि थेट ग्राहकांशी संपर्क वाढवण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
दुपारनंतर जिल्हा परिषद हुतात्मा सभागृहात आयोजित जिल्हा आढावा बैठकीत विविध योजनांची प्रगती, SMART उपक्रम, उद्दिष्टपूर्ती आणि लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोच यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. आवश्यक सुधारणा आणि तातडीच्या अंमलबजावणीसंबंधी सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रानडे, अतिरिक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे, प्रकल्प संचालक डॉ. सातपुते, गट विकास अधिकारी संजय भोये, सहाय्यक गट विकास अधिकारी बापूराव नाळे, DMM रवी बोबडे तसेच सर्व तालुका आणि ब्लॉक मिशन व्यवस्थापक उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / NAVIN NARESH PATIL