
लातूर, 4 डिसेंबर (हिं.स.)।
सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांचा 'रक्तदान' महासंकल्प! वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ नको, रक्तदानाचे 'महागिफ्ट' हवे!
सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवत सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त यावर्षीही भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. आपला वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा व्हावा, या आपल्या कायमच्या आग्रहातून त्यांनी कार्यकर्ते, पदाधिकारी आणि हितचिंतकांना हार-पुष्पगुच्छ आणण्याऐवजी रक्तदान करून या सामाजिक उपक्रमात सहभागी होण्याची नम्र विनंती केली आहे.
रक्त आवश्यक असलेल्या आपल्या बांधवांच्या आणि भगिनींच्या निरोगी आरोग्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून भव्य रक्तदान शिबीर आयोजित करत असल्याची माहिती त्यांनी दिली. यंदाही त्यांनी याच जाणिवेतून हा 'रक्तदानाचा महासंकल्प' पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.
रक्तदान हेच माझ्यासाठी सर्वात मोठे गिफ्ट
सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी त्यांच्या सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, मित्रपरिवार, हितचिंतक आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सर्वांना भावनिक आवाहन केले आहे. कोणीही त्यांना शुभेच्छा देण्यासाठी हार, पुष्पगुच्छ किंवा इतर कोणतेही गिफ्ट घेऊन येऊ नये, अशी त्यांची विशेष विनंती आहे. आपण केलेले रक्तदान हेच माझ्यासाठी सर्वात मौल्यवान वाढदिवसाचे गिफ्ट आहे, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
हे भव्य रक्तदान शिबीर ५ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आले असून, सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत रक्तदात्यांना सहभागी होता येणार आहे. शिबिराचे स्थळ शिव छत्रपतीनगर, इंद्रायणी निवासस्थान, शिरूर ताजबंद येथे आहे.
सहकार मंत्र्यांच्या या विधायक आणि सामाजिक आवाहनाला प्रतिसाद देत परिसरातील नागरिक आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने या रक्तदान शिबिरात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis