
रत्नागिरी, 4 डिसेंबर, (हिं. स.) : देवरूख येथील श्री गणेश वेदपाठशाळेच्या २८व्या वर्धापन दिनानिमित्त येत्या ७ डिसेंबरपासून विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. धार्मिक आणि ज्ञानरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचा प्रारंभ रविवार, दि. ७ डिसेंबर रोजी होणार आहे. ७ ते ९ डिसेंबर या तीन दिवशी सकाळी ८:०० ते १२:३० या वेळेत 'श्री सूक्त याग' आयोजित केला जाणार आहे. सायं. ६ ते ८ या वेळेत कॉर्पोरेट कीर्तनकार समीर लिमये यांचे 'गुरुसेवा' या विषयावर कीर्तन होणार आहे. दि. ८ डिसेंबर रोजी सायं.६ वाजता गीता उपासनी, पुणे यांचे 'अध्यात्मवादी सावरकर' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. दि. ९ डिसेंबर या समारोपाच्या दिवशी हभप रोहिणी माने-परांजपे, पुणे यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. त्यांना तबलासाथ केदार लिंगायत आणि हार्मोनियम साथ चैतन्य पटवर्धन (रत्नागिरी) करणार आहेत.
रविवार, दि. ७ डिसेंबर ते मंगळवार दिनांक ९ डिसेंबर, २०२५ रोज रात्री ८:०० ते ९:०० या वेळेत उपस्थित सर्वांसाठी भोजन प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व कार्यक्रमासाठी भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन श्री गणेश पाठशाळेतर्फे करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी